Latest

न्यायालयाच्या आदेशानंतरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, हडपसर पोलिसांना न्यायालयाचा दणका

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  न्यायालयाने आदेश देऊन बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल करून न घेता महिलेला परत पाठवणार्‍या हडपसर पोलिसांना लष्कर न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणात एका पिडीत महिलेनी विशाल सुरज सोनकर रा. वानवडी गाव यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात ड. साजिद शाह यांच्यामार्फत धाव घेतली होती.

तीने तिच्या तक्रारीमध्ये तिला लग्नाचे आमिष दाखवून संशयीत आरोपीने बलात्कार ,  अनैसर्गिक कृत्य केल्याचे तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले होते. तसेच त्याने तिचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल केल्याची धमकी दिल्याचे व ते फोटो नातेवाईकांना पाठविल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.

त्यानंतर तक्रारदार महिला हडपसर पोलिस ठाण्यात गेली असताना न्यायालयाचा आदेशाची प्रत पोलिसांना दिली असताना त्यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. न्यायालयाने 156 (3) च्या अर्जावर दि. 6 ऑक्टोबर रोजी आदेश दिले होते. न्यायालयाचे आदेश असतानाही गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात अ‍ॅड. शाह यांनी पुन्हा न्यायालयाकडे तक्रारअर्ज केल्यानंतर याप्रकरणात आता न्यायालयाने हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

माझ्या आशिलावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तिची पोलिस ठाण्यात तक्रार घेतली न घेतल्याने आम्ही न्यायालयात 156 (3) नुसार अर्ज करून याप्रकरणात बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, अपहार, फसवणूक यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही अशीलाचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यावर आता आम्ही कन्टेम्प्ट ऑफ कोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर लष्कर न्यायालयाने हडपसर पोलिस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
                                       – अ‍ॅड. साजिद शाह, तक्रारदार महिलेचे वकील.

SCROLL FOR NEXT