Latest

राजकारणी अन् राजगुरूंची युती अभेद्य! हात दाखवणारे मुख्यमंत्री शिंदे एकमेव नेते नव्हेत…

मोहन कारंडे

मुंबई; नरेश कदम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरच्या अशोक खरात या ज्योतिषाला आपला हात दाखविल्याने त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. परंतु ज्योतिषाकडे जाणारे ते एकटे नेते नाहीत. महाराष्ट्राच्या अनेक राजकारण्यांचे आध्यात्मिक आणि राजकीय गुरू आहेत. काही राजकारणी आपल्या राजकीय गुरूंना उघड उघड भेटतात तर काही गुपचूप पडद्याआड!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून थेट शिर्डी गाठली. ही राजकीय घाई अर्थात साई दर्शनासाठी नव्हती. सिन्नर येथील संख्याशास्त्री अशोक खरात या ज्योतिषाला त्यांनी आपला हात दाखविला आणि तमाम राजकारण्यांनी आणि पुरोगामी चळवळीतील विचारवंतांनी त्यांच्यावर चौफेर टीका केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते हे सत्य साईबाबांना मानत. सचिन तेंडुलकरही सत्य साईबाबांना मानत असे. भय्यू महाराज यांचेही महाराष्ट्राच्या राजकारण्यांमध्ये मोठे प्रस्थ राहिले. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक पक्षीय नेते हे त्यांचे भक्त होते. राजकीय भविष्य बघणारे एकनाथ शिंदे हे एकमेव राजकीय नेते नव्हेत. ज्या शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना उभी केली त्या शिवसेनेचे ठाकरे बंधूदेखील जैन मुनींचा सल्ला घेत असतात.

नाणीज पीठाचे शंकराचार्य नरेंद्र महाराज यांच्या वलयाचीही भुरळ अनेक नेत्यांना पडली असून नरेंद्र महाराजांच्या जाहीर कार्यक्रमात ही नेतेमंडळी हजेरी लावत असते. दिल्लीतील चंद्रा स्वामी आज हयात नाहीत. मात्र एक काळ राजकीय गुरू म्हणून त्यांचेही प्रस्थ मोठेच होते. कराजकारण्यांबरोबरच अनेक प्रशासकीय अधिकारी यांचा या गुरूंकडे राबता असतो. अनेक क्रीम पोस्टिंग मिळविण्यासाठी याचा वापर होत असतो. राजकारण्यांच्या गुरूंच्या संस्थांना सरकारी जमिनी देण्यात आल्या आहेत. मतदारसंघातील लाखो लोकांना मोहित करणाऱ्या राजकारण्याचे हे कच्चे दुवे असतात. ते मानत असलेल्या राजकीय गुरूच्या सल्ल्याप्रमाणे त्यांची राजकीय वाटचाल ते करत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर कितीही टीका झाली तरी राजकीय गुरू आणि राजकारणी यांची युती किंवा आघाडी कधीही तुटणार नाही. आपल्या राजकारणात सदा सर्वकाळ टिकून असलेली ही एकमेव युती म्हणता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT