Latest

ऑस्ट्रेलियातील ‘ती’ रहस्यमय वस्तू भारतीय रॉकेटचा तुकडा!

Arun Patil

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनार्‍यावर 17 जुलैला एक रहस्यमय वस्तू वाहून आली होती. एखाद्या मोठ्या डब्यासारख्या दिसणार्‍या या वस्तूने लोकांचे कुतुहल वाढले होते. आता ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीने या वस्तूबाबतचा खुलासा केला आहे. ही वस्तू म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भारतीय रॉकेटचा तुकडा असल्याचे या स्पेस एजन्सीने म्हटले आहे. तिसर्‍या स्टेजमध्ये वेगळा झालेला हा 'पीएसएलव्ही' लाँच व्हेईकलचा भाग आहे.

या वस्तूच्या तपासणीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीला दोन आठवड्यांचा कालावधी लागला. आधी ही वस्तू म्हणजे हेरगिरीचे एखादे उपकरण असावे किंवा बेपत्ता झालेल्या 'एमएच 370' या विमानाचा भाग असावा अशी शंका व्यक्त केली जात होती. अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.

ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीने म्हटले आहे की सध्या हा 2 मीटर उंचीचा तुकडा स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतराळ करारानुसार भारतही या तपासणीत सहयोग करीत आहे. तपासणीसाठी ऑस्ट्रेलियाने जगभरातील स्पेस एजन्सींशी संपर्क साधला होता. रॉकेटचा हिस्सा ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने त्याचे छायाचित्र ट्विट करून म्हटले होते, ज्युलियन बे, पश्चिम ऑस्ट्रेलिया येथे सापडलेल्या या वस्तूची आम्ही तपासणी करीत आहोत. हा एखाद्या परदेशी स्पेस लाँच व्हेईकलचा भाग असू शकतो.

या स्पेस एजन्सीने संबंधित वस्तूला हात लावू नये असे लोकांना आवाहनही केले होते. तसेच अशी एखादी वस्तू दिसली तर स्पेस एजन्सीशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले होते. ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीने किंवा 'इस्रो'नेही या वस्तूची अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियात लोक या तुकड्याचा संबंध 'चांद्रयान-3' मोहिमेशी लावत आहेत. या यानाचे 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता लाँचिंग झाले होते. त्यावेळी यानाला अंतराळात सोडण्यासाठी वापरलेल्या रॉकेटचा हा भाग असावा असे अनेक लोक म्हणत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT