Latest

ठाकरेंचे खासदार थेट भाजपच्या उमेदवार यादीत, कलाबेन डेलकर यांना भाजपची उमेदवारी

backup backup
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपने शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान खासदारालाच उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्यकारक धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाच्या दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांचे नाव भाजपच्या दुसऱ्या यादीत आल्याने अनेकांना नवल वाटले. दादरा नगर हवेलीतून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यापूर्वी त्या पोटनिवडणुकीद्वारे शिवसेनेतर्फे खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर त्या ठाकरे गटात होत्या. मात्र आज भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
दादरा आणि नगर हवेलीचे सातवेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांचा मृतदेह फेब्रुवारी २०२१ मध्ये दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील एका हॉटेलच्या खोलीत आढळला होता. त्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती. ही पोटनिवडणूक शिवसेनेच्या वतीने लढत कलाबेन डेलकर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी सादर केली. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अशा मोठ्या नावांना उमेदवारी मिळाली. याच यादीमध्ये दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातुन कलाबेन डेलकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
SCROLL FOR NEXT