Latest

पांढर्‍या गेंड्यांसाठीही ‘टेस्ट ट्यूब बेबी’ तंत्र!

Arun Patil

लंडन : मनुष्य प्रजातीमध्ये 'आयव्हीएफ' तंत्राच्या वापराने मुलांचा जन्म होणे ही काही आता नवलाईची बाब राहिलेली नाही. या तंत्रालाच सामान्य भाषेत 'टेस्ट ट्यूब बेबी' म्हटले जाते. प्रयोगशाळेत भ्रूण विकसित करून तो मातेच्या किंवा सरोगेट मदरच्या गर्भात स्थापित केला जात असतो. आता दुर्मीळ पांढर्‍या गेंड्यांची प्रजाती वाचविण्यासाठी असाच प्रयोग करण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या प्रयोगात भ्रूणाला सरोगेट मदरच्या गर्भात यशस्वीरीत्या स्थापितही करण्यात आले आहे.

नॉर्दन व्हाईट र्‍हायनो ही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या प्रजातीमधील केवळ दोनच गेंडे पृथ्वीतलावर शिल्लक राहिले आहेत. आता सदर्न व्हाईट र्‍हानोंच्या सहाय्याने उत्तरेतील पांढर्‍या गेंड्यांचा वंश वाचवला जात आहे. दक्षिणेकडील ही प्रजाती उत्तरेकडील पांढर्‍या गेंड्यांचीच जवळच्या नात्यामधील एक उपप्रजाती आहे. जर्मनीतील लिबनीझ इन्स्टिट्यूट फॉर झू आणि वाईल्डलाईफ रिसर्चमधील सुसान होल्झ यांनी याबाबतची माहिती दिली. हे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधकांनी दक्षिणेतील पांढर्‍या गेंड्यांमध्ये हा 'आयव्हीएफ' तंत्राचा सध्या प्रयोग केला आहे. आता तसाच प्रयोग उत्तरेकडील पांढर्‍या गेंड्यांबाबतही केला जाईल. त्यामध्ये प्रयोगशाळेत उत्तरेकडील पांढर्‍या गेंड्यांचे भ्रूण मादीच्या गर्भात स्थापित केले जाईल. या मार्गाने नॉर्दन व्हाईट र्‍हायनोंची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या या प्रजातीमधील नाजीन आणि फाटू नावाचे दोनच गेंडे शिल्लक राहिले आहेत.

SCROLL FOR NEXT