Latest

दहशतवाद्यांनी बॉम्ब बनविण्यासाठी थाटली प्रयोगशाळा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात दहशतवाद्यांच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशातच आता त्यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी मिनी प्रयोगशाळा थाटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ती प्रयोगशाळा शोधून काढत बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले असल्याची माहिती एटीएसच्या वतीने देण्यात आली आहे.

याप्रकरणात राजस्थान येथील एनआयएच्या गुन्ह्यात फरार झालेले दहशतवादी इम—ान खान आणि मोहंमद साकी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतील माहितीवरून त्यांना आश्रय देणार्‍या अब्दुल कादीर पठाणला एटीएसने अटक केली. या तिघांच्या चौकशीत त्यांना सिमाब काझी या मॅकॅनिकल इंजिनिअरला आर्थिक रसद पुरविल्या प्रकरणात अटक झाली होती. ही आर्थिक मदत मिळवून त्यांनी राज्यातील विविध जंगलांची रेकी केली होती. तसेच तेथे बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतल्या होत्या.

आपले अस्तित्व सर्वांसमोर येऊ नये, यासाठी हे दहशतवादी हॉटेलमध्ये न थांबता टेन्टमध्ये वास्तव्य करीत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यांना बॉम्ब बनविण्याचे ट्रेनिंग मिळाले होते. त्या टेररिंगसाठी या दहशतवाद्यांनी मिनी प्रयोगशाळा सुरू केली होती. त्या प्रयोगशाळेतील साहित्य त्यांना सिमाब काझी यांनी खरेदी करून दिले होते. एटीएसच्या तपासात मोहम्मद खान, मोहम्मद साकी यांच्याकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे.

त्यात केमिकल पावडर, चारकोल, थर्मामीटर, ड्रॉपर, सोल्डींग गन, मल्टिमीटर, छोटे बल्ब, बॅटर्‍या, अलार्म क्लॉक, तसेच दुचाकी चोरी करता लागणारा पाणा जप्त करण्यात आला आहे. तसेच सिमाब काझी याने थर्मामीटर, ड्रॉपर, पिपेट हे मोहम्मद खान, मोहम्मद साकी यांच्यासाठी खरेदी केले होते. ज्या ठिकाणावरून काझी याने खरेदी केली होती, त्याठिकाणची चौकशी करण्यात आली आहे. मोहम्मद खान या दहशतवाद्याने बॉम्ब बनविण्यासाठी केमिकल्स आणि प्रयोगशाळेतील उपकरणे एका ठराविक ठिकाणी लपवून ठेवली होती. एटीएसने केलेल्या तपासात केमिकल्स आणि उपकरणे मिळून त्याने एटीएसला काढून दिली आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT