Latest

शिवसेना (ठाकरे) दसरा मेळावा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ‘हे’ १० ठळक मुद्दे | Dasara Melava Shiv Sena

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचा (ठाकरे गट) दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर झाला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान टीका केली. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे.

१. आमच्या नादाला लागू नका. महाराष्ट्रात आणि देशात बरेच प्रश्न आहेत. मनोज जरांगे पाटील यांना धन्यवाद, त्यांनी आज धनगर समाजाला साद घातली, ही चांगली गोष्ट. अंतरवली सराटी येथे आंदोलकांवर अत्याचार झाले, हे जनरल डायरचे सरकार आहे. मी मुख्यमंत्री असतानाही हा प्रश्न होता, पण आम्ही लाठीमारचा आदेश दिला नव्हता. जालन्याचा डायर कोण, याची चौकशी का नाही झाली. हा विषय लोकसभेत सोडवावा लागेल. सर्वांना न्याय देणारा निर्णय संसदेत व्हावा.

२. मी तुम्हाला किंमत देत नाही. जाती-जातीत झुंजवण्याचे काम भाजप करत आहे. भाजप-जनसंघ यांच्या कोणत्याही लढ्याशी संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र, मराठावाडा मुक्ती या कोणत्याही आंदोलनात ते नव्हते. भाजप जिथे जाते तिथे सत्यानाश करते, त्यांच्यापासून सावध राहा. भगव्यातही यांनी दुही केली. या भांडणात खऱ्या प्रश्नांकडे दुलर्क्ष करायचे.

३. आपण अपात्रतेविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालया दररोज यांचे गाल फोडत आहे.

4. या देशात घटना, सर्वोच्च न्यायालय, लोकशाही टिकणार आहे की नाही याकडे आमचे लक्ष आहे. निवडणुका लावून दाखवा, जनता ठरवेल कोण पात्र ते आणि कोण अपात्र.

५. मी घराणेशाहीचा पाईक आहे, पण ज्यांना कुटुंब संस्थाच माहिती नाही, ते आम्हाला काय बोलणार. आम्ही पोसलेली घराणेशाही तुम्ही डोक्यावर घेऊन बसलात, ती आधी खाली करा. आम्ही घराण्याची परंपरा जपणारे आहोत. सद्दाम हुसेन, हिटलर, स्टॅलिन यांची घराणी कुणाला माहिती आहेत? ज्याच्या घराण्याचा आगापिछा माहिती नाही, त्यांना निवडायचे का ते तुम्ही ठरवा.

६. देशात स्थैर्य आले आहे का, तुमचे प्रश्न सुटले आहेत का? एका बहुमताचे पाशवी सरकार नको. खुर्ची डळमळीत असली की देश मजबुत होतो. २०१४ची त्यांची भाषणं काढून पाहा.

७. आमच्या लोकांना त्रास देऊ नका, अन्यथा आमचे सरकार येताच तुम्हाला उलटे टांगू. हा इशारा सरकारी अधिकाऱ्यांनाही आहे.

८. मणिपूरला जाऊन हनुमान चालीसा म्हणा, आहे का हिंमत? माझ्यासाठी नाही तर मराठी मातीसाठी सहानुभूती ठेवा. बुलेट ट्रेनचा फायदा मराठी माणसांना होणार आहे? मुंबई-महाराष्ट्र बकाल करण्याचा डाव आहे, मला ते मोडून काढायचे आहे. मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईची स्वायत्ता मारली जात आहे. सगळी महत्त्वाची केंद्र मुंबई बाहेर नेले जात आहेत. कोरोना काळातील घोटाळ्याची चौकशीच करायची असेल, पीएम केअर फंडापासून सगळ्या राज्यांची चौकशी करा. आम्ही मुंबई वाचवली, पण मुंबईची बदनामी केले जात आहे. तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवत होता, आणि गोरगरिबांना पाच रुपयात जेवण दिले.

९. हे आता धारावी गिळायला निघालेत. हा विकास मित्राचे खिसे भरण्यासाठी होणार आहे. गिरणी कामगारांच्या मुलांना धारावीत घरे द्यावीत. मुंबईवरील मराठी ठसा गडद करायचा आहे.

१०. दुष्काळीस्थिती आहे, टँकर सुरू झाले आहेत. पण पीक विमा कंपन्यांनी आग्रीम देऊ केलेली नाही. शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बरोबर उभा राहील. शेतकरी वाऱ्यावर आहेत, समाज रस्त्यावर आहेत. भगव्याशी गद्दारी करणारा या मातीत ठेवायचा नाही. कुरुलकरबद्दल संघाची आणि भाजपची भूमिका काय आहे? आमचं हिंदुत्व मातीशी जोडलेले आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. निवडणुकीत तुमचा राजकीय कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहाणार नाही. हिंमत असेल तर मुंबई महापालिकेसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुका घ्या, आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ.

SCROLL FOR NEXT