पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्रीय समितीचे (BRS) अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी हैदराबादमध्ये पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बीआरएसच्या के. कविता यांनी जाहीरनामा पाहून भाजप आणि काँग्रेस घाबरले आहे, असे म्हणत दोन्ही विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. (Telangana Politics)
बीआरएसच्या जाहीरनाम्यावर पक्षाच्या एमएलसी कविता यांनी सांगितले की, आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी बीआरएसने जाहीरनामा जारी केल्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. राज्यालाच नव्हे तर देशाला वेगळ्या वाटेवर घेऊन जाणारा हा जाहीरनामा आहे. त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही खूप चांगले धोरण तयार करत आहोत आणि आम्ही ते चालू ठेवले आहे. आमचा जाहीरनामा हा आमच्या नेत्याच्या मनाचे अगदी स्पष्ट प्रतिबिंब आहे. (Telangana Politics)
कविता यांनी सर्वप्रथम काँग्रेसवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, 'बीआरएसचा जाहीरनामा नेहमीप्रमाणे गरिबांच्या विकासाशी संबंधित आहे. हे पाहून काँग्रेस आणि भाजपचे धाबे दणाणले आहेत. त्या पुढे म्हणाल्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डीयांनी आमचा जाहीरनामा रफ पेपर आहे, अशी टीका केली आहे. आमचा जाहीरनामा जर रफ पेपर असेल, तर काँग्रेस पक्षाची स्थिती टिश्यू पेपरपेक्षाही वाईट आहे. काँग्रेस पक्ष ६५ वर्षे सत्तेत राहिला, पण त्यांनी कधी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा विचारही केला का? अशी टीका के.कविता यांनी केली आहे. (Telangana Politics)
बीआरएस एमएलसीने भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाले की, भाजपने साडेनऊ वर्षांच्या कार्यकाळात तेलंगणासाठी एकही विशेष प्रकल्प दिला नाही. त्यांनी तेलंगणाला नेहमीच नाकारले. काल भाजपचे जी किशन रेड्डी बीआरएसच्या जाहीरनाम्यावर बोलत होते. यावरून के.कविता म्हणाल्या, 'आम्ही रेड्डी यांना विचारतो की त्यांनी दोन कोटी नोकऱ्या आणि रेल्वे प्रकल्पाच्या आश्वासनाचे काय झाले? १० वर्षात तुम्ही जे बोललात त्यातले काहीही तुम्ही साध्य केले नाही. त्यामुळे यंदाच्या तेलंगणा विधानसभा निवडणूकीत भाजपचे डिपॉझिटही शिल्लक राहणार नाही असे के. कविता यांनी भाजपवर टीका करत हल्लाबोल केला आहे. (Telangana Politics)