Latest

तेलंगणा विधानसभा निवडणूक : काँग्रेस आक्रमक, ‘बीआरएस’ची कोंडी

Arun Patil

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतून चंद्राबाबू नायडू यांच्या 'टीडीपी' पाठोपाठ वाय. एस. शर्मिला यांच्या वायएसआरटीपी पक्षाने माघार घेतली आहे. नायडू यांच्या पक्षाने कोणत्याही अन्य पक्षाला पाठिंबा दिला नसला तरी 'वायएसआरटीपी'ने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. एकीकडे कमजोर पडत चाललेली भाजप तर दुसरीकडे इतर पक्ष निवडणुकीतून बाहेर पडत असल्याचा थेट फायदा उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती (बीआरएस) करीत आहे. सत्ताविरोधी लाटेवर स्वार होत काँग्रेसने आक्रमक प्रचारास सुरुवात केल्याने 'बीआरएस'ची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सत्तेत असताना घोटाळा केल्याचा आरोप झालेले टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू हे अलीकडेच जामिनावर बाहेर आले आहेत; मात्र तत्पूर्वी आंध्रवर जास्त लक्ष केंद्रित करावयाचे असल्याचे सांगत त्यांनी तेलंगण निवडणुकीतून माघार घेतली होती. तिकडे आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी भ्रष्टाचारी 'बीआरएस'ला सत्तेतून बाहेर काढावयाचे असल्याचे सांगत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. नायडू किंवा शर्मिला यांच्या पक्षाचा तेलंगणमध्ये प्रभाव नसला तरी काही मतदारसंघात निकाल फिरविण्याची क्षमता या पक्षांमध्ये आहे. हे दोन्ही पक्ष बाहेर पडल्याने काँग्रेस विरुद्ध बीआरएस अशी थेट लढत होणार आहे.

जगनमोहन आणि् शर्मिला यांनी आधीच आपले मार्ग वेगळे केलेले आहेत. तेलंगणमध्ये काँग्रेसला मदत करण्याच्या बदल्यात शर्मिला यांना आंध्र प्रदेशात काँग्रेस मदत करीत करू शकते. चंद्राबाबू नायडू यांनी टीडीपी निवडणूक लढविणार नाही, असे सांगितल्यानंतर पक्षाच्या बर्‍याच नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. ज्ञानेश्वर यांनी तर 'बीआरएस'ची वाट धरली आहे. टीडीपीच्या नेत्या-कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न जशी बीआरएस करीत आहे, तशी ती काँग्रेसही करीत आहे.

काँग्रेसचे आव्हान तगडे असल्याची जाणीव चंद्रशेखर राव यांना आहे. त्यामुळेच पुढील काळात झंझावाती प्रचार करण्याची योजना त्यांनी आणली आहे. 13 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत 54 प्रजा आशीर्वाद कार्यक्रम घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

28 तारखेला राव यांची शेवटची सभा ते निवडणूक लढवित असलेल्या गजवेल मतदारसंघात होणार आहे. गजवेल आणि कामरेड्डी अशा दोन मतदारसंघातून राव नशीब आजमावत आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर असंख्य नेत्यांनी भाजपला रामराम केला आहे. ही अर्थातच पक्षासाठी चिंतेची बाब आहे. मागील काही काळात के. राजगोपाल रेड्डी, जी. विवेक आणि वाय. श्रीनिवास रेड्डी यासारख्या मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. पी. श्रीनिवास रेड्डी आणि माजी मंत्री जे. कृष्णा राव यांनी भाजप प्रवेशासाठी विचारणा केली होती, तेव्हा भाजपने त्याकडे फारशे लक्ष दिले नाही, आता हेच नेते काँग्रेसमध्ये गेले आहेत.

ओबीसी समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे; मात्र त्यासाठी खूप उशीर झाला असल्याचे मानले जात आहे. राज्यात भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे. भाजपकडून शेवटच्या टप्प्यात स्टार प्रचारकांना मैदानात उतरविले जाण्याचा अंदाज आहे. मात्र, त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत कितपत फायदा होणार, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

भाजपकडून सुपरस्टार पवन कल्याण

भाजपने सुपरस्टार पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र खुद्द भाजपच्या प्रादेशिक नेत्यांना ही बाब पसंत पडलेली नाही. जनसेना पक्षाचा राज्यात ना दबदबा आहे, ना केडर आहे. त्यामुळे भाजपला ही युती महागात पडू शकते. जो पक्ष आंध्रमध्ये आपली छाप सोडू शकत नाही, तो तेलंगणमध्ये काय करणार, असे स्थानिक भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

भाजपचा मोहभंग होणार?

कर्नाटक पाठोपाठ तेलंगणची सत्ता प्राप्त करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसलेली असताना दुसरीकडे भाजप स्पर्धेतून बाहेर पडते की काय, अशी स्थिती आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी तेलंगणकडे पाठ फिरवल्याने प्रचारात काँग्रेस-बीआरएस यांनी मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला फायदा मिळू नये, यासाठी भाजपने धोरणात्मक माघार तर घेतलेली नाही ना, अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT