Latest

टेक इन्फो : चॅट जीपीटीचे भवितव्य काय?

Arun Patil

चॅट जीपीटी या प्रणालीची चौथी आवृत्ती नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली. तीन महिन्यांत लोकप्रिय ठरलेल्या, त्याचवेळी शैक्षणिक क्षेत्रात बदनाम झालेल्या या प्रणालीचे काम काही काळाकरिता थांबवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. उद्योगपती अ‍ॅलन मस्क यांनी तसे पत्रच लिहिले आहे. या सर्व गोष्टींचा हा घेतलेला आढावा…

नोव्हेंबर महिन्यात चॅट जीपीटी हा सामान्यांच्या भेटीला आला आणि जगभरात त्याची एकच चर्चा झाली. काय आहे चॅट जीपीटी? वापरकर्त्याने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्याकडे होतेच, त्याशिवाय त्याला प्रबंध, निबंध किंवा कथा, कविता लिहायला सांगितली, तर लिहून पूर्ण करतो. ए.आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेली ही प्रणाली आहे. ए.आय. ही संकल्पना आता सर्वांनाच परिचयाची झालेली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात तिने केव्हाच प्रवेश केला आहे. आपल्याला ती बहुतेकवेळा जाणवत नाही इतकेच! चॅट जीपीटीने मिळवलेले यश हे अभूतपूर्वक असेच आहे. म्हणूनच त्याची चौथी आवृत्ती तीन महिन्यांत सादर केले गेली. तेव्हा यापुढे किमान सहा महिने तरी या प्रोजेक्टला विश्रांती देण्यात यावी, असे सूचनावजा आवाहन टेस्लाचे सर्वेसर्वा अ‍ॅलन मस्क आणि ए.आय. तज्ज्ञांनी केले आहे. चॅट जीपीटी यासोबतच अशाप्रकारचे जे कोणते अन्य प्रकल्प सुरू आहेत, त्या सर्वच प्रकल्पांना थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ए.आय.संबंधित सर्वच कंपन्या परिणामांचा विचार न करता, अधिकाधिक ताकदीचे, जास्त क्षमतेचे नवे मॉडेल कसे विकसित करता येईल, याचाच विचार करत आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे, याचा कोणीही विचार करत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. हा विचार न करताच नवीन प्रणाली सादर करण्याची ही स्पर्धा अशीच कायम राहिली; तर उद्या एखाद्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही डोळे उघडाल, तेव्हा तुमच्या जगाचा ताबा यंत्रांनी घेतलेला असेल आणि ही यंत्रे तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असतील. असे घडणे अशक्य नाही, याकडे तंत्रज्ञांनी लक्ष वेधले आहे.

मायक्रोसॉफ्ट या दिग्गज टेक कंपनीने पुरस्कृत केलेल्या ओपन ए.आय.ने त्याच्या जीपीटी (जनरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्स्फॉर्मर) ए.आय. प्रोग्रामच्या चौथ्या पुनरावृत्तीचे अनावरण केले, ज्याने वापरकर्त्यांना मानवासारख्या संभाषणात गुंतवून, गाणी तयार करून आणि लांबलचक कागदपत्रांचा सारांश देऊन आश्चर्यचकित केले. 29 मार्च रोजी हा प्रोग्राम खुला करण्यात आला. ओपन ए.आय.ने प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकप्रकारे अशा पद्धतीचे मॉडेल विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. अल्फाबेट (गुगलची पेरेंट कंपनी) आपली प्रणाली मे महिन्यात सादर करेल, असे म्हटले जाते.

'फ्यूचर ऑफ लाईफ' या संस्थेच्या माध्यमातून हे पत्र पाठवण्यात आले आहे. या संस्थेला अ‍ॅलन मस्क यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. त्यामुळे त्यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली गेली आहे.

ए.आय. तंत्रज्ञानाचा गेल्या काही वर्षांपासून अनेक उद्योगांत वापर सुरू झाला आहे. मात्र, चॅट जीपीटीचा वापर करताना तो त्याच्याशी थेट संवाद साधू देत असल्याने, तो अधिक परिणामकारक झाला आहे. ए.आय. प्रभावीपणे काम करताना दिसून येते. ही प्रणाली संगणकाचे कोड दुरुस्त करू शकते, तसेच इंटरनेटवर जे जे उपलब्ध आहे, ते सगळे समजावून सांगू शकते. मात्र, शैक्षणिक क्षेत्रात या प्रणालीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी सर्वच ठिकाणाहून केल्या जात आहेत. इटलीमध्ये तर चॅट जीपीटीवर बंदीच घालण्यात आली आहे. चॅट जीपीटी आणि चॅट जीपीटी फोर यामध्ये तुलनात्मकद़ृष्ट्या खूप फरक आहे. नवी प्रणाली अधिकाधिक परिपूर्ण कशी होईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे. तसेच तो टेक्स्ट आणि इमेज या दोन्ही माध्यमातून काम करतो, हे त्याचे वैशिष्ट्य त्याला अन्य ए.आय. प्रणालीपेक्षा अधिक प्रगल्भ बनवते. तसेच ते त्याला 'एजीआय' (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) च्या तोडीचे बनवते. म्हणजेच चॅट जीपीटी फोरची बुद्धिमत्ता आणि मानवाची बुद्धिमत्ता एक असल्याचे मानले जाते. याच गोष्टीने ए.आय. तज्ज्ञ काळजीत पडले आहेत. त्यांना याचीच चिंता भेडसावत आहे. या तंत्रज्ञानाचा गैरउपयोग झाला; तर फार मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. म्हणूनच या सर्व शक्यतांचा विचार करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात यावा. त्यादरम्यान नवी प्रणाली विकसित केली जाऊ नये, असा आग्रह धरण्यात आला आहे. या सहा महिन्यांत चॅट जीपीटी फोर नेमका कसा कार्य करतो, हे समजून घेण्यात येईल. तंत्रज्ञ, धोरणकर्ते तसेच समाजातील इतर घटकांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत आपले अनुभव सांगितले गेले पाहिजेत. याचा सारासार विचार करून, पुढील दिशा ठरवली गेली पाहिजे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रावर मस्क यांच्यासह एक हजारहून अधिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. तथापि, ओपन ए.आय.चे मुख्य कार्यकारी सॅम ऑल्टमन, अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांनी स्वाक्षरी केलेली नाही. मात्र, स्टेबिलिटी ए.आय.चे सीईओ इमाद मुश्ताक, डीप माईंडचे संशोधक योशुआ बेन्गिओ यांनी स्वाक्षरी केली आहे. योशुआ यांना ए.आय.चे गॉडफादर म्हणून संबोधले जाते, हे महत्त्वाचे.

चॅट जीपीटीने राष्ट्रीय सुरक्षा तसेच शिक्षणावर होणार्‍या दुष्परिणामांबद्दल लक्ष वेधून घेतल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला. तसेच फिशिंग, चुकीची माहिती आणि संगणकीय व्यवहारात होऊ शकणारा संभाव्य गैरवापर, याकडे सायबरतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. हे अत्यंत गंभीर असल्याचे मानले जाते. डिजिटली संपूर्ण जग जोडले जात असताना, सायबर सुरक्षा मशिनच्या हाती जाणे किंवा तिला धोका पोहोचणे, हे परवडणारे नाही. म्हणूनच या प्रणालीचे संपूर्ण अवलोकन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्याच्या विकासाचा वेग हा रोखावाच लागेल, हे मात्र नक्की; अन्यथा विनाशाकडेच अंधपणाने केलेली ही वाटचाल असेल, असे म्हणावे लागेल.

अ‍ॅलन मस्क यांनी पत्रात कल्पित समस्या मांडली आहे. त्यापेक्षा अनेक तीव्र प्रत्यक्षातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वंशद्वेष, लिंगभेद यातून आपण अद्याप बाहेर पडलेलो नाही, याकडे काही तंत्रज्ञांनी लक्ष वेधले आहे. मात्र, पत्रात नमूद केल्याप्रमाणे इंटरनेटवर प्रचारकी तसेच धादांत खोटा मजकूर ए.आय.चा वापर करून पसरवला गेला, या वस्तुस्थितीचा कोणी स्वीकार करत नाही.

चॅट जीटीपीचा वापर करून अमेरिकेतील एका लेखिकेने कार्टून मालिका तयार केली. 18 पानांच्या या पुस्तिकेचे बौद्धिक स्वामित्वाचे हक्क तिला देण्यातही आले होते. मात्र, संबंधित न्यायालयाने आपल्या निर्णयात बदल करत, तिला हे हक्क देता येणार नाहीत, असे कळवले आहे. सदर कार्टून हे मानवी लेखकत्वाचे उत्पादन नाही, त्यामुळे लेखकाला केवळ कथानकाचे हक्क मिळतील, असा निवाडा देण्यात आला. त्याविरोधातील लढाई यापुढे सुरूच राहणार आहे. चॅट जीपीटीचा वापर करून एखादी कलाकृती निर्माण केल्यास त्याच्या स्वामित्वाचे हक्क नेमके कोणाला द्यायचे, हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. वापरकर्ता, कार्यप्रणालीची कंपनी का, कोणीही नाही, हा प्रश्न येत्या काही काळात तीव्र होणार आहे. याच्या उत्तरावर अब्जावधी डॉलरची उलाढाल होणार आहे.

त्याचवेळी अमेरिकेतील अनेक कलाकार तसेच कंपन्यांनी ए.आय.चा वापर करताना बौद्धिक संपदेचे हक्क देण्यास विरोध दर्शविला आहे. ए.आय. प्रणाली कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कायदेशीररीत्या संरक्षित केलेली सामग्री गोळा करते आहे, असा आरोप होत आहे. स्टॉक फोटोसाठी प्रसिद्ध असलेली गेटी इमेजेस, काही कलाकारांचा गट आणि संगणकतज्ज्ञ यांनी ए.आय. कंपन्यांविरोधात कॉपीराईट उल्लंघनासाठी स्वतंत्र खटले दाखल केले आहेत. चॅट जीपीटी आणि बौद्धिक स्वामित्व हा एक वेगळाच विषय असून, येत्या काळात तो गंभीर झालेला दिसून येईल.

संजीव ओक 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT