Latest

Team India in WC Final : भारताची दिमाखात फायनलमध्ये धडक! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India in WC Final : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी टीम इंडिया 1983, 2003 आणि 2011 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

भारताने टॉस जिंकून पहिला फलंदाजी केली. त्यानंतर विराट कोहली (117), श्रेयस अय्यर (105), शुबमन गिल (नाबाद 80), रोहित शर्मा (47), केएल राहुल (नाबाद 39) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 397 धावांचा डोंगर रचला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघ 48.5 षटकांत सर्व विकेट्स गमावून 327 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यांच्या डॅरेल मिचेलने (134), केन विल्यमसन (69), ग्लेन फिलिप्स (41) यांनी सामना जिंकण्यासाठी झुंज दिली. टीम इंडियाच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 बळी मिळवले. तर जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवला 1-1 विकेट मिळाली. (Team India in WC Final)

398 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये 46 धावा करताना संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे प्रत्येकी 13 धावा करून बाद झाले. पॉवरप्लेच्या सुरुवातीच्या षटकात किवी सलामीवीरांनी सावधपणे शॉट्स खेळले. 5 षटकांत संघाची धावसंख्या बिनबाद 30 धावा होती. येथे मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर यश संपादन केले आणि कॉनवेला बाद केले. एवढेच नाही तर शमीने रचिन रवींद्रला ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्यानंतर केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. मिचेल आणि केन या दोघांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. रोहितने ही जोडी फोडण्याची जबाबदारी शमीवर टाकली. शमीनेही संघाला नाराज केले नाही आणि आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. शमीने एकाच षटकात दोन विकेट्स मिळवल्या. शमीने प्रथम केनला (69) बाद केले. त्यानंतर शमीने टॉल लॅथमची शिकार केली. त्यानंतर मिचेल आणि फिलिप्स यांनी काहीकाळ झुंज दिली पण त्यांना त्यात अपयश आले. काही अंतरांनी विकेट पदत गेल्या. आणि अखेर किवी संघ ऑलआऊट झाला.

तत्पूर्वी, भारताने विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांच्या जोरावर 397 धावांचा डोंगर रचला. कोहलीने यावेळी आपले 50वे वनडे शतक साजरे करत वर्ल्ड रेकॉर्ड रचला. कोहलीने यावेळी सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडीत काढला. कोहलीने यावेळी नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 117 धावा केल्या. कोहलीपेक्षा यावेळी श्रेयस जास्त जलद खेळला. कारण श्रेयसने यावेळी फक्त 70 चेंडूंत चार चौकार आणि आठ षकारांच्या जोरावर 105 धावांची खेळी साकारली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT