Latest

Team India : टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 बनण्याची संधी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाने या दौऱ्यात आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून पहिला सामना आरामात जिंकला होता आणि आता दुसऱ्या सामन्यातही रोहित सेना विजयाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-0 ने जिंकल्यास त्यांना आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 बनता येणार आहे. भारतीय संघाने हा पराक्रम यापूर्वीच केला आहे. चला तर जाणून घेऊया की टीम इंडिया आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 कसा बनू शकते.

अशा प्रकारे क्रमांक 1 बनता येणार

भारतीय संघ सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. जर टीम इंडियाने विंडिजविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली, त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन सामने जिंकले, तर टीम इंडिया कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम राहील. टी-20 क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास तिथेही भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. सध्या कोणताही अव्वल संघ टी-20 मालिका खेळत नाहीय. अशा स्थितीत भारतीय संघ दीर्घकाळ अव्वल स्थानावर राहू शकतो. पण एकदिवसीय क्रमवारीत भारत मागे आहे.

टीम इंडियाला 'हे' काम वनडेमध्ये करावे लागणार

खरं तर, टीम इंडिया आयसीसी वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियन संघ 118 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान क्रिकेट संघ 116 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, टीम इंडियाचे रेटिंग 115 आहेत, परंतु टीम इंडिया या दोन्ही संघांना मागे टाकू शकते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. जर टीम इंडियाने ही मालिका 3-0 ने जिंकली आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिला सामना गमावला तर टीम इंडिया 116 रेटिंग गुणांसह एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचेल. असे झाल्यास पुन्हा एकदा टीम इंडिया आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटवर राज्य करेल.

SCROLL FOR NEXT