Latest

शिक्षक दिन विशेष : संस्कारदूतांच्या योगदानाविषयी कृतज्ञभाव

Arun Patil

शिक्षकी पेशा हा प्रतिष्ठित पेशा असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी तर जगात शिक्षकी पेशाइतका समाजाच्या द़ृष्टीने महत्त्वाचा असणारा कोणताही पेशा नाही, असे नमूद केले आहे. शिक्षक हा मूल्यांचा प्रवाह जिवंत ठेवणारा आणि सतत प्रवाहित ठेवण्यासाठी कष्टत राहणारा घटक आहे. समाजात आनंद पेरणारा, मुलांच्या मनात सर्जनशीलता, कल्पकता, आत्मविश्वास, विवेक, चिकित्सकता निर्माण करणार्‍या शिक्षकांमुळे आपल्याला आनंददायी समाज निर्माण करता येतो. या संस्कारदूतांच्या कार्याबद्दल त्यांना आभार मानायला हवेत. त्यासाठीच आजचा शिक्षक दिन अधिक उत्साहाने साजरा व्हायला हवा.

चार भिंतीच्या आत असलेल्या विद्यार्थ्यांची मने प्रज्वलित करण्याचे काम शिक्षक करीत असतो. समाजात शहाणपण पेरणीचे, राष्ट्रनिर्मितीचे आणि विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न पेरणी करणारा शिक्षकच असतो. बालकांच्या मनावर संस्कार करीत जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षकच करीत असतात. शिक्षकांच्या पेरणीवरच बालकांच्या जीवनाचा डोलारा उभा असतो. बालकांच्या जीवनप्रवासात पेरलेल्या विचार बीजांवरती विद्यार्थी भविष्यात भरारी घेत असतात. ती भरारी किती उंच घ्यायची हे शिक्षकांनी पेरलेल्या विचारांवर अवलंबून असते. शिक्षक हाच जीवनाचा आधार असतो. कारण प्रत्येक बालकाचे आयुष्य चार भिंतीच्या आत घडत असते. त्या संस्काराची वाट निर्माण करणार्‍या या संस्कारदूतांच्या आजवरच्या कार्याबद्दल त्यांना आपण आभार मानायला हवेत.

कोणत्याही राष्ट्राची प्रगतीची भरारी हे दाखवत आली आहे की, भूतकाळात शिक्षणातून बरेच काही पेरले आहे म्हणून यशाची भरारी घेता आली आहे. आपणाला विकासाची भरारी दिसते; मात्र त्यासाठी पेरणारे हात दिसत नाहीत. ते स्वप्न पेरण्याचे काम शिक्षणातून होत असते. त्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरते. कृतज्ञता व्यक्त करणारी व्यवस्था आणि समाज शिक्षकसमूहाबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त करीत आला आहे. उद्याचा भारत कसा हवा आहे, त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठीच्या बीजांची पेरणी शिक्षणातून करावी लागते. उद्याच्या प्रकाशासाठी वर्तमानातच प्रकाशाच्या वाटा निर्माण कराव्या लागतात. त्या वाटा निर्माण करण्यासाठी शिक्षकांनाच प्रकाश व्हावे लागते. ते जितके प्रकाशमान असतील, तितक्या वाटा उजळून निघतात.

शिक्षक हा ज्ञानाची साधना करणारा आणि सतत ज्ञानाची तृष्णा राखणारा वर्ग आहे. ज्ञानसंपन्नता हाच शिक्षकाचा महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळे अखंड ज्ञानसाधना करणारा शिक्षक अखंड ज्ञानसाधना करणारा विद्यार्थी निर्माण करू शकतो. अशी अखंड ज्ञानसाधना असलेला समाज प्रगत आणि महान ठरतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी निरंतर ज्ञानसाधनेचा वसा जपला होता. भारतीय तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास, त्याबाबतचे चिंतन, तत्त्वज्ञानाबद्दलची मानवी आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून जगभरासमोर केलेली मांडणी यामुळे देशाची प्रतिमा उंचावली गेली. त्याचबरोबर जगाचा आपल्या तत्त्वज्ञानाकडे पाहण्याच्या द़ृष्टिकोनातच बदल झाला होता. एक शिक्षक काय करू शकतो त्याचेच हे प्रतिबिंब होते.

स्वतःला चिंतनात गाडून घेत त्यांनी जीवनभर अभ्यासाचा मार्ग अनुसरला होता. आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहात त्यांनी शिक्षकी पेशाची प्रतिमा उंचावली. कोणत्याही देशाचा आधारस्तंभ हा शिक्षकच असतो. तो जितका भक्कम असेल, तितके राष्ट्र भक्कम उभे राहते. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षकांना सल्ला देताना सांगितले होते की, शिक्षकांनी नेहमीच बौद्धिक एकात्मता व सार्वत्रिक अनुकंपा यांचा पाठपुरावा केला पाहिजे. शिक्षकांवर किती मोठी जबाबदारी असते याची जाणीव या सल्ल्यातून सहजपणे होत राहते. शिक्षकांनी आपली संस्कृती, मूल्य यांचा सतत विचार करायला हवा. मूल्य, कौशल्य, भारतीय परंपरा यांचा विचार अध्ययन अध्यापन प्रक्रियेत केला जायला हवा. शेवटी मूल्यांचा विचार शिक्षणात महत्त्वाचा ठरतो.

मार्कावर सतत गुणांचा वरचष्मा असायला हवा आहे. राधाकृष्णन यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील मूल्यांचा विचार अत्यंत महत्त्वपूर्ण मानत त्या दिशेने जाण्यासाठीचा आग्रह धरला होता. त्यात समाज व राष्ट्राचे भले आहे. त्यासाठी पुस्तकातील आशय अधिक जिवंत करण्यासाठी शिक्षकांनी आपल्या जगण्याचे अनुभव समृद्ध करायला हवेत. त्या अनुभवाशी मूल्य, जीवनकौशल्य, गाभा घटक यांची सांगड घालायला हवी. शिक्षणातून मूल्ये हरवली तर उद्याचा समाज जो अनुभवावा लागेल तो अत्यंत कृतघ्न असेल. तो कृतघ्न समाज हिंसक असेल हेही लक्षात घ्यायला हवे. शिक्षकांना स्वतःच्या एका कंपूत राहून शिक्षण परिणामकारक करता येणार नाही. शिक्षक हा जेव्हा समाजापासून तुटेल तेव्हा समाजातील सर्वच हरलेले असेल. त्यामुळे समाजातील प्रत्येक चळवळीत त्याने भूमिका घेण्याची गरज आहे.

समाज चळवळीने जिवंत राहतो. त्या चळवळीत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी सक्षमतेने उभे राहावे लागेल. जगभरातील अनेक चळवळींत शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हा इतिहास आहे. तो इतिहास वर्तमान आणि भविष्य ठरण्याची गरज आहे. शिक्षकांनी प्रवाहपतीत न होता विचाराच्या जोरावर अस्तित्व पेलण्याची गरज आहे. शिक्षकांच्या मागे समाज उभा राहिला तर समाज व राष्ट्र घडते. मात्र शिक्षक कोणाच्या मागे फिरू लागला आणि त्याने फिरावे म्हणून व्यवस्थेने प्रयत्न केले तर तो आपले सत्व गमावून बसेल. सत्वहीन शिक्षकांचा समूह राष्ट्रहिताकरिता उपयोगी पडत नाही. त्यामुळे समाज व राष्ट्राची अधोगती होईल. शिक्षक स्वाभिमानी आणि प्रामाणिक ठेवण्यासाठी धुरिणांनी जबाबदारी आपल्या मस्तकी घेण्याची गरज आहे. त्यामुळे चांगल्या विचाराच्या चळवळीसाठी शिक्षकांनी एकत्रित येऊन राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची गरज आहे. तोच शिक्षक समाजाच्या सुख-दुःखात एकत्रित राहिला नाही, तर उद्यासाठी आपण अंधार पेरत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. समाजापासून दूर गेल्याने समाजाचे किती नुकसान होईल, त्यापेक्षा अधिक नुकसान शिक्षक समूहाचे होणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे.

शिक्षक हा द्रष्टा असतो आणि तो असायला हवा. शिक्षक हा वर्तमानातील व्यवस्थेपेक्षा काही दशक पुढे असतो. त्याचे हे पुढे असणे त्याला समाजात आदराचे स्थान प्राप्त करून देत असते. शिक्षक हे देशातील सर्वोत्तम विचारवंत असतात. त्यामुळे कोणत्याही समाजाची उंची मोजायची असेल तर त्या देशातील शिक्षकांची उंची मोजा, असे म्हटले जाते. त्याचे कारण शिक्षकांच्या उंचीपेक्षा समाजाची उंची अधिक असू शकत नाही. त्यामुळे शिक्षक समुदायास सतत स्वतःची उंची वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. शिक्षक नव्याचा पाठलाग करणारा असतो. काळाच्या सोबत नव्हे तर काळाच्या पुढे पाहणारी द़ृष्टी आणि त्यासाठी पावले टाकणारी वृत्ती त्याच्यात सामावलेली असते.

SCROLL FOR NEXT