Latest

Good News ! शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून, गुरुवारी (दि.28) किंवा 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे 30 हजार शिक्षकांची पदे रिक्त असून, खासगी अनुदानित संस्थांमधील सुमारे 20 हजार पदे रिक्त आहेत. परंतु, रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. काही आमदारांनी रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला. त्यामुळे 10 टक्के जागा बाजूला ठेवून 70 टक्के पदांची जाहिरात काढणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेतील 20 ते 21 हजार आणि खासगी संस्थांमधील 18 हजार अशा तब्बल 38 -39 हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागातर्फे काही दिवसांपूर्वी 2017 च्या सुमारे 2 हजार 500 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, त्यातील केवळ 332 जागांसाठीच उमेदवार मिळाले. तसेच पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये एसटी संवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती देणे आवश्यक आहे. राज्यात पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्ह्यांत एसटी संवर्गाच्या सुमारे 6 हजार जागा आहेत. मात्र, राज्यात त्यासाठी केवळ अडीच हजार उमेदवार उपलब्ध असल्याचे शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून आढळून आले आहे. त्याचप्रमाणे गणित विषयात टीईटी उत्तीर्ण उमेदवार मिळत नसल्याने या जागासुद्धा रिक्त राहत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही एसटी संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार आहेत.

आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण
सुमारे महिनाभारांपूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, ग्रामविकास विभागाकडून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरीही काही किरकोळ कामे पूर्ण करण्यासाठी सुट्या वगळून दोन दिवस जिल्हा परिषदांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT