Latest

सांगली : रस्त्याकडेला सापडली पाच महिन्यांची बालिका

backup backup

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : बलगवडे (ता. तासगाव) येथे बलगवडे-वायफळे रस्त्याच्या कडेला साधारणपणे 5 ते 6 महिने वय असणारी लहान बालिका पहाटे 6 वाजता आढळून आली. बालिका सुखरूप असून तिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत माहिती अशी : बलगवडे येथील काही लोक रविवारी पहाटे तासगाव- भिवघाट रस्त्यावर व्यायामासाठी गेले होते. दरम्यान, त्यांना रस्त्याकडेला लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. या आवाजाने प्रारंभी अंधार असल्याने संभ्रम निर्माण झाला.

मात्र सततच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत अंदाजे सहा महिने वयाची बालिका दिसून आली. अरविंद पाटील यांनी याची माहिती रघुनाथ पाटील, राजेंद्र रास्ते, सूरज शिंदे यांना दिली. त्यानी घटनास्थळी धाव घेऊन ती बालिका ताब्यात घेतली.

गटारीत फेकून दिल्यामुळे या बालिकेच्या तोंडाला थोडी जखम झाली होती. बालिका गुंडाळलेल्या कपड्यांना गवतातील कूसळ, धूळ माखली होती. थंडीमुळे बालिका एकसारखी रडत असल्याने तिला तातडीने गावातील प्राथमिक उपकेंद्रात आणण्यात आले.

महिला कर्मचारी शुभांगी मोहिते व हेमलता जगताप यांनी बालिकेचे कापडे बदलून बाळाला दूध व पाणी पाजले. गावातील काही महिलांनी माणुसकीचे दर्शन घडवत कोणी दूध तर कोणी आपल्या लहान बाळाचे कपडे, आणून दिले. याविषयी सरपंच जयश्री पाटील यांनी तासगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बालिकेला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

SCROLL FOR NEXT