Latest

तामिळनाडूतील राजकीय रस्सीखेच

Arun Patil

थाई महिन्यात नवी संधी, नव्या आकांक्षा, आशा पल्लवीत होतात, असा तमिळ नागरिकांचा विश्वास आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांनाही तमिळ नवीन वर्ष हे नव्या पर्वाचे संकेत देत असल्याचे वाटत आहे. पोंगलच्या धावपळीबरोबरच राजकीय पक्षांनीही राज्यात नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पोंगलनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेला निघाले आहेत आणि केंद्रात असलेल्या सत्तारूढ भाजप अयोध्येतील आनंदोत्सवात बुडून निघाला आहे.

तामिळनाडूत सध्या पोंगलच्या धावपळीबरोबरच राजकीय पक्षांनीही राज्यात नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तमिळ पंचांगात थाई महिन्याला खूपच शुभ मानले जाते आणि या महिन्यात अनेक प्रकारच्या घडामोडींना वेग येतो. यामागचा मार्गजी महिना हा अशुभ मानला जात असल्याने या काळात कोणतेही नवीन काम हाताशी घेतले जात नाही. म्हणून थाई महिन्यात चैतन्य असते. हा एक पीक उत्सव असून तो उत्साहात साजरा करण्यात येतो. या काळात तामिळनाडूतील जवळपास सर्वच मोठी शहरे रिकामी होतात. अनेक नागरिक गावाकडे सण साजरा करण्यासाठी जातात. जी मंडळी शहरात राहतात तीदेखील ग्रामीण संस्कृतीत न्हाऊन निघतात.

आता तर राजकीय पक्ष, सार्वजनिक संस्था आणि खासगी कंपन्याही पारंपरिक पोंगल उत्सवाचे आयोजन करताना दिसतात. ठिकठिकाणी रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटल्या जातात. ग्रामीण खेळाचे आयोजन केले जाते. त्यात पुुरुष आणि महिला डोळ्यावर पट्टी बांधून मिठाईने भरलेले भांडे तोडतात. यावेळी तमिळ नागरिक आपली भाषा, समृद्ध आणि प्राचीन संस्कृतीचे स्मरण करतात आणि तीच त्यांच्या ओळखीचा आधार राहते. तमिळ भाषा ही जगातील सर्वात जुन्या शास्त्रीय भाषेपैकी एक आहे. ही इसपूर्व तिसर्‍या शतकापासून बोलली जाते. ही संस्कृतपेक्षा जुनी भाषा असल्याचे मानले जाते अणि त्याचे मूळ द्रविडशी जोडलेले आहे. म्हणूनच तमिळ नागरिकांनी बहुतांश प्रथा, परंपरा जोपासल्या आहेत. या कारणांमुळेच ते आपल्या भाषेबाबत आग्रही असतात.

या कारणांमुळेच काही वर्षांपूर्वी तमिळ नागरिकांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत पारंपरिक ग्रामीण खेळ जल्लीकटू पुन्हा सुरू करण्यासाठी एकत्रपणे आवाज बुलंद केला. अनेक प्राणी हक्क संघटनेने या खेळावर बंदी घालण्याची मागणी केली. या खेळात बैलांना नियंत्रित करताना अनेक तरुण जखमी होतात, तर काहींचा दुर्दैवी मृत्यू होतो. असे असतानाही अखेर या जुन्या परंपरेचा विजय झाला आहे. अर्थात, देशातील दोन्ही राष्ट्रीय पक्षांना ही परंपरा अंगीकारण्यासाठी काही वेळ घेतला. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर भाजप या प्रथेबाबत राजी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तमिळ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी या खेळाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच पंतप्रधान मोदी हे पारंपरिक पेहराव करत दिल्लीत कॅबिनेटमधील सहकारी एल. मुरुगन यांच्या सरकारी निवासस्थानी दाखल झाले.

गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी चेन्नई दौर्‍यात तमिळ नागरिकांसमोर आपली भूमिका मांडली. पंतप्रधानांना तमिळहित चांगले ठाऊक आहे, हे त्यांनी नागरिकांना सांगितले; पण यावेळी एक गोष्ट नमूद करावी लागेल आणि ती म्हणजे, तमिळ नागरिक सध्या पुराचा सामना करत आहेत. तेथे मदतकार्य पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने विलंब लावला आणि त्यावरून टीकेला सामोरे जावे लागले आहे; मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी राज्यात पक्ष उभारणीसाठी अथक परिश्रम केले आहेत आणि त्यांना काहीअंशी यश मिळाले आहे. अण्णा द्रमूकने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाधिक नुकसान हे भाजपला सहन करावे लागले आहे. निवडणुका आता जवळ आहेत आणि भाजप अजूनही अण्णा द्रमूकशी हात मिळवण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे भाजपबरोबर जाण्याची अण्णा द्रमूकची तयारी दिसत नाही. अण्णा द्रमूक राज्यातील राजकारण हे काळानुसार राहिले आहे. म्हणूनच हा पक्ष अल्पसंख्याक, मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो.

अन्य समान विचारसरणीच्या पक्षांसमवेत तामिळनाडूत तिसरी आघाडी उभारण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना फारसे यश मिळालेले नाही. दुसरीकडे अण्णा द्रमूकलाही बळकट आघाडी तयार करताना अडचणी येत आहेत. द्रमूकच्या नेतृत्वाखालील आघाडीचा सामना करू शकेल, अशारितीने बांधणी करण्यास यश आलेले नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची वक्तव्ये पाहिली, तर अण्णा द्रमूकमधून बाहेर पडलेल्या पक्षांवर भाजपची नजर आहे, असे लक्षात येते.

यात माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वमचा गट आणि दुसरे म्हणजे एन. शशिकला यांचा भाचा टीटीके दिनाकरन यांच्या नेतृत्वाखालील गट याचा उल्लेख करता येईल. त्यांच्याशी भाजपने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवंगत नेते अभिनेते विजयकांत यांचा पक्ष डीएमडीके हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होऊ शकतो. वास्तविक भाजपचे खरे लक्ष्य हे ए. पलानीसामी (इपीएस) यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमूकशी आघाडी करण्याचे आहे. राज्यातील राजकारणात आणखी एक महत्त्वाचा खेळाडू पीएमके. हा भाजपच्या आघाडीत दाखल होऊ शकतो.

यापूर्वीही या पक्षाने भाजपशी युती केली होती; मात्र पीएमके आणि जी. के. वासन यांचा टीएमसी म्हणजेच तमिळ मनिला काँग्रेस हे कोणासोबत जातात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अण्णा द्रमूक की भाजप? वास्तविक, आघाडी करताना केवळ भाजपलाच नाही तर अण्णा द्रमूकलाही अडचणी येत आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर अण्णा द्रमूकला आतापर्यंत कोणत्याच पक्षासमवेत ताळमेळ बसविता आलेला नाही. त्यामुळे तामिळनाडूत विरोधी गटात फाटाफूट पडेल आणि त्याचा फायदा स्टॅलिन यांना होऊ शकेल. फरक एवढाच की, अल्पसंख्याकाच्या मतांत विभागणी होण्याची शक्यता अधिक आहे. हे मत पूर्वी द्रमूकच्या पारड्यात असायची. आता ती अण्णा द्रमूकच्या पारड्यात जाऊ शकतात. त्याचवेळी द्रमूकच्या गोटातही सर्वकाही अलबेल आहे, असेही समजण्याचे कारण नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT