Latest

Tamil Nadu bans cotton candy | पुद्दुचेरीसह तामिळनाडूत ‘कॉटन कँडी’च्या विक्रीवर बंदी, कारण काय?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : तमिळनाडू सरकारने राज्यात 'कॉटन कँडी'च्या विक्रीवर बंदी घातली आहे. कारण त्यात कर्करोगास कारणीभूत असलेले केमिकल्स आढळून आल्याची पुष्टी चाचणी अहवालांतून झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पुद्दुचेरीत 'कॉटन कँडी'वर बंदी घातली होती. आता तामिळनाडू सरकारने 'कॉटन कँडी'च्या विक्रीवर बंदी घातली आहे.

गव्हर्नमेंट फूड ॲनालिसिस लॅबोरेटरीने केलेल्या रंगीत कापूस कँडीच्या नमुन्यांच्या विश्लेषण केले. त्यात कापड डाय आणि रोडामाइन-बी या रासायनिक संयुगाचे मिश्रण आढळून आले. हे मानवी आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या विविध कलमांतर्गत हे नमुने 'निकृष्ट आणि असुरक्षित' असल्याचे घोषित करण्यात आले. तसेच तामिळनाडूचे आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम यांनी शनिवारी 'कॉटन कँडी'च्या विक्रीवर बंदीची घोषणा केली.

रोडामाइन बी-लेस्ड उत्पादनांची विक्री अथवा पॅकिंगमध्ये कोणाचाही सहभाग आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना या प्रकरणी सखोल तपासणी करण्याचे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

"कायद्यानुसार लग्न समारंभात आणि सार्वजनिक ठिकाणी रोडामाइन-बी असलेले खाद्यपदार्थ तयार करणे, पॅकेजिंग करणे, आयात करणे, विक्री करणे, सर्व्ह करणे हा दंडनीय गुन्हा आहे," असे सुब्रमण्यम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या बंदीचा राज्यभरातील शेकडो 'कॉटन कँडी' विक्रेते आणि उत्पादकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे. 'कॉटन कँडी' लहान मुलांना खूप आवडते. कारण ती तोंडात लगेच विरघळते. पण त्यात विषारी घटक आढळून आल्याने ती खाण्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरिरावर होतात घातक परिणाम

रोडामाइन-बी हा एक रंग आहे ज्याचा वापर औद्योगिक कारणांसाठी केला जातो. याचा वापर लेदर कलरिंग तसेच पेपर प्रिंटिंगमध्ये केला जातो. त्याचा वापर फूड कलरिंगसाठी करता येत नाही आणि याचा वापर खाद्यपदार्थात केल्यास आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते. याच्या सेवनाने श्वासोच्छवासाचा त्रासही होऊ शकतो.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT