Latest

तळोजा तुरुंग : कैद्यांच्या वाट्याचे पाणी जातेय काळ्याबाजारात; आरोपींचा आरोप

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईतील तळोजा कारागृहात कैद्यांना पाण्याचा कमी प्रमाणात पुरवठा केला जात असून, पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी सागर गोरखे याने केला आहे. या प्रश्‍नी कैदी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे पत्र त्याने गृहमंत्री, सत्र न्यायालय, कारागृह महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाला पाठवले आहे.

तळोजा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. सत्र न्यायालयाच्या नियमावलीनुसार कैद्यांना मुलभूत सोईसुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र तळोजा तुरुंग प्रशासन कैद्यांना पाणी, वैद्यकीय सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रत्येक कैद्याला दिवसाला 135 लिटर पाणी देणे बंधनकारक असले, तरी केवळ एक बादली म्हणजे 15 लिटर पाणी दिले जाते. हे एक बादली पाणी कैद्याला संपूर्ण दिवस पुरवावे लागते. पाण्याचा तुटवडा नसताना हा प्रकार सुरू असून, कैद्यांच्या वाट्याचे पाणी बाहेर काळ्या बाजारात विकले जात असल्याचा आरोप सागर गोरखे याने केला आहे.

या परिस्थितीच्या निषेधार्थ शहरी नक्षलवाद प्रकरणातील कैद्यांनी 20 मे रोजी एकदिवसीय उपोषण केले होते. तळोजा कारागृह प्रशासनाकडून आवश्यक सुविधा मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा सागर गोरखे यानेे पत्रातून दिला असून, अन्य कैदी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे म्हटले आहे.

पत्रात वाचला तक्रारींचा पाढा

कोठड्यांमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने कैद्यांना त्वचारोग होत आहेत, वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत. शहरी नक्षलवाद खटल्यातील आरोपींवर अन्याय केला जात आहे. आरोपींना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना 5-6 तास वाट पाहावी लागते. दिवसाला सुमारे 500 नातेवाईक कैद्यांना भेटण्यासाठी येतात, मात्र त्यांच्यासाठी वेटिंग रूमची सोय नाही. कैद्यांनी नातेवाइकांना लिहिलेली पत्रे आधी स्कॅन करून तपासयंत्रणेकडे पाठवली जातात व येणारी पत्रेही तपासयंत्रणेला दिली जातात. या पत्रांमधील बराचसा मजकूर खोडला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT