Latest

चर्चा जपानच्या चांद्रमोहिमेची!

Arun Patil

भारताच्या चांद्रयान मोहिमेची चर्चा जगभरात सुरू असताना जपानच्या लँडरने अनोखी किमया करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दोन रात्री अंधारात काढून जपानचा लँडर पुन्हा सक्रिय झाल्याने जगभरातील शास्त्रज्ञ जपानच्या अवकाशतज्ज्ञांचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे जगातील अन्य देश चंद्रावर लँडर पाठविण्याची तयारी करत असताना जपानच्या अवकाश संशोधन केंद्राने केलेला कारनामा कौतुकास्पदच आहे.

जपानचा मानवरहित मून लँडर चंद्रावर दोन रात्री व्यतित करूनही अचानक सक्रिय झाला. विशेष म्हणजे भारताच्या चांद्रयान-3 ने एका रात्रीनंतर काम करण्याचे थांबविले होते. त्याला जागे म्हणजेच कार्यान्वित करण्याचे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले. अशावेळी जपानच्या या यशाचे कौतुक करायला हवे. जपान आणि भारत यांच्या अवकाश संशोधन संस्थांचे सहकार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रामुख्याने चांद्रयान-2 मोहिमेशी संबंधित अनेक माहितीचे आदानप्रदान भारताने जपानला केले होते. भारताचे चांद्रयान-2 हे चंद्राच्या दुसर्‍या बाजूला उतरण्यातही यशस्वी ठरले नव्हते. चांद्रयान-2 च्या अर्धवट यशानंतर चांद्रयान -3 च्या यशाने जपान बरेच काही शिकले. ही बाब भारतासाठी सुखावह आहे. म्हणून उभय देशांत आगामी काळात सहकार्यात वाढ होईल, अशी आशा आहे. वास्तविक दोन्ही देश पुढच्या वर्षी चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहेत.

तूर्त जपानच्या या चांद्र अभियानावर चर्चा करणे अधिक गरजेचे आहे. जपानचे यान 'स्लिम' हे सप्टेंबर महिन्यातच चंद्राकडे रवाना झाले. 'स्लिम'ने 25 डिसेंबर रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि 19-20 जानेवारीला ते अशा ठिकाणी उतरले की, त्याची अपेक्षा केली जात नव्हती. काही दिवस त्याने कामच केले नाही. शेवटी ते अनेक प्रयत्नांनंतर 29 जानेवारी रोजी सक्रिय झाले; मात्र त्याच्याकडे वेळ कमी होता, कारण ते ज्या ठिकाणी उतरले होते, तेथे 31 जानेवारी रोजी रात्र होणार होती व तापमान खाली येणार होते. शास्त्रज्ञांच्या आशा मावळल्या होत्या. वास्तविक हे लँडर चंद्रावर रात्र व्यतित करण्यात सक्षम असल्याचे मानले जात नव्हते; परंतु तो एक चमत्कारच घडला. चंद्रावर चौदा दिवसांची रात्र काढल्यानंतर 'स्लिम' जागे झाले आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ते सक्रिय झाले. आता ते चंद्रावरचे फोटो पाठवत आहे. ही अवकाश विज्ञानासाठी आनंदाची बातमी आहे. चंद्रावर रात्र झाल्याने ही मोहीम संपलीच, असे मानले जात होते; परंतु ती अजूनही सुरूच आहे.

शास्त्रज्ञांकडून त्याची पडताळणी केली जात आहे. लँडर अशा ठिकाणी उतरले की, त्याला सूर्यापासून ऊर्जा मिळत आहे. स्लिम ज्या तंत्रज्ञानाच्या बळावर चंद्रावर जागे आहे, त्या तंत्रज्ञानाचा विकास करणे गरजेचे आहे. चंद्रावरील या कडक्याच्या थंडीच्या भागात पाण्याची शक्यता आहे. तेथे योग्य चाचपणी करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या लँडरने तेथे दिवस-रात्र काम करण्याची गरज आहे. जपानसाठी ते मोठे यश आहे.

चंद्रावर उतरणारा या शतकातील जपान हा तिसरा देश आहे. यापूर्वी भारत आणि चीन चंद्रावर उतरले आहेत. अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन हे मागच्या शतकात चंद्रावरच उतरले. एकुणातच चंद्रावर यशस्वीपणे पोहोचणारा जपान हा पाचवा देश आहे. प्रत्यक्षात जपानचे हे यश दुसर्‍या देशांतील अवकाश संशोधकांनाही प्रेरणादायी ठरेल. 'स्लिम'च्या क्षमतेवर विशेष रूपातून अभ्यास करणे गरजेचे आहे. चंद्रावर उतरणे सुलभ करण्याबरोबरच तेथे राहणे आणि विशेषत: रात्र काढणार्‍या उपकरणाचा विकास करणे आवश्यक आहे. सध्या चीन या द़ृष्टीने युद्धपातळीवर काम करत आहे; मात्र चंद्रावर कोणाचे नशीब अधिक उजाडते, हे पाहणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक लँडर जपानच्या 'स्लिम'प्रमाणे भाग्यवान नसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT