पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsSA T20 WC : टी 20 विश्वचषक स्पर्धेतील मोठा सामना आज पर्थच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना रंगणार आहे. यात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. ग्रुप-2 च्या गुणतालिकेबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत कोणत्याही संघाला भारताला हरवता आलेले नाही आणि टीम इंडिया 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेनेही अद्याप पराभव पाहिलेला नाही. पण झिम्बाब्वेविरुद्धच्या त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. आहे. त्यातून मिळालेल्या एक गुणासह त्यांचे सध्या 3 गुण झाले आहेत. अशा परिस्थितीत आजचा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
द. आफ्रिका भारताविरुद्ध दोन डावखुरे वेगवान गोलंदाज खेळवण्याची शक्यता
द. आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज खेळवले आहेत. पर्थच्या मैदानावर ते ही रणनीती बदलू शकतात. वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवून त्याऐवजी वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनला संघात संधी देऊ शकते. जेन्सन गेल्या अनेक मालिकांमध्ये भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आहे. तो संघात आल्यास दक्षिण आफ्रिकेकडे दोन डावखुरे वेगवान गोलंदाज असतील. जेन्सेनशिवाय वेन पार्नेल याचाही संघात समावेश आहे. याशिवाय पर्थमध्ये एनरिच नोरखिया भारतासाठी खूप धोकादायक ठरू शकतो.
सध्या केएल राहुलने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली आहे. त्याचा खराब फॉर्म पाहून द. आफ्रिकेविरुद्ध ऋषभ पंतला ओपनिंगला पाठवले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सामन्याच्या एक दिवस आधी संघ व्यवस्थापन असा काही विचार करत नसल्याचे स्पष्ट केले. अशा स्थितीत राहुल आज रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल यात शंका नाही. या विश्वचषकात अप्रतिम फॉर्मात असलेल्या विराट कोहलीकडे पुन्हा एकदा धावा करण्याची जबाबदारी असणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत कोहली बाद झालेला नाही, पण त्याला द. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध सावधपणे खेळावे लागणार आहे. या सामन्यातही सूर्यकुमार यादव भारताचा एक्स फॅक्टर ठरू शकतो. वेगवान गोलंदाजांविरुद्ध विकेटच्या मागे फटके खेळण्याची त्याची कला आज खूप प्रभावी ठरेल.
रोहित शर्मा आजच्या सामन्यात एक महत्वाचा बदल करू शकतो. द. आफ्रिकेकडे अनेक डावखुरे फलंदाज असून ते अक्षरच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारून धावा वसूल करण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना वेसण घाण्यासाठी कॅप्टन रोहित हर्षल पटेलला संधी देवून रणनितीत बदल करेल.
तर दुसरीकडे पंतला संधी देऊन संघाची फलंदाजी मजबूत करण्यास प्राध्यान्य देईल असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. असे झाल्यास हार्दिक पांड्यासह 4 वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज अशी रणनीती घेऊन भारत मैदानात उतरेल.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल/ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग