Latest

INDvsBAN T20WC: भारताचा बांगलादेशवर विजय, सेमी फायनलचा मार्ग मोकळा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : T20 World Cup Ind vs ban : भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 185 धावा करायच्या होत्या, मात्र पावसामुळे त्यांना 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. पण 16 षटकांत सहा विकेट्सवर ते केवळ 145 धावाच करू शकले.

बांगलादेशला शेवटच्या षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने केवळ 14 धावा दिल्या. नुरुल हसन सोहनने एक चौकार आणि एक षटकार मारून सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयामुळे भारताचा सेमी फायनलचा मार्ग सुकर झाला आहे. रोहित ब्रिगेडचे चार सामन्यांत सहा गुण झाले आहेत. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्याचबरोबर बांगलादेशचे चार सामन्यांतून चार गुण झाले असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

भारताकडून या सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. भारताकडून कोहलीशिवाय केएल राहुलने 32 चेंडूत 50 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 30 धावा केल्या. रविचंद्रन अश्विन सहा चेंडूत 13 धावा करून नाबाद राहिला. दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल प्रत्येकी सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. हार्दिक पांड्याने पाच आणि रोहित शर्माने दोन धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूदने तीन तर शकिब अल हसनने दोन बळी घेतले.

बांगलादेशच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर लिटन दासने 27 चेंडूत 60 धावा केल्या. नूरुल हसन 14 चेंडूत 25 धावा करून नाबाद राहिला. नजमुल हुसेन शांतोने 21, शाकिब अल हसनने 13 आणि तस्किन अहमदने नाबाद 12 धावा केल्या. मोसाद्देक हुसेनने सहा आणि अफिफ हुसेनने तीन धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन बळी घेतले. मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली. विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

बांगलादेशच्या लिटन दासची झुंझार खेळी अपयशी

प्रत्युत्तरात, 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर लिटन दास आणि नजमुल हुसेन शांतो यांनी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला. दुस-या षटकात लिटन दासने अर्शदीप सिंगला तीन चौकार लगावले. या षटकात बांगलादेशला 14 धावा मिळाल्या. त्यानंतरच्या तिस-या षटकात लिटनने भुवनेश्वर कुमारची धुलाई केली. त्याने एक षटकार आणि दोन चौकांरांच्या सहाय्याने या षटकात 16 धावा वसूल केल्या. 5 व्या षटकात लिटनने पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमारवर आक्रमण केले. या षटकात त्याने एक षटकार ठोकून बांगलादेशची धावसंख्या 5 षटकात 44 वर नेली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात लिटन दासने तुफानी खेळी केली. त्याने शमीच्या या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार, दुस-या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार मारले. या षटकात लिटने षटकार ठोकून 21 चेंडूत अर्धशतक फटकावले. 6 षटकात बांगलादेशच्या सलामीवीरांनी 16 धावा चोपल्या. यावेळी बांगलादेशची धावसंख्या 6 षटकात बिनबाद 60 होती. पण या षटकानंतर पावसामुळे काहीवेळ खेळ थांबवण्यात आला.

बांगलादेशने सात षटकांत 66 धावा केल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ते भारतापेक्षा 17 धावांनी पुढे होते. येथून सामना झाला नसता तर बांगलादेश विजय निश्चित होता. अखेर पाऊस थांबला पण 4:30 वाजण्यापुढे षटके कापण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सामना पुन्हा 4.50 वाजता सुरू करण्यात आला. यावेळी बांगलादेशला विजयासाठी 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यांनी सात षटकात बिनबाद 66 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत त्यांना आता नऊ षटकांत आणखी 85 धावांची गरज होती. लिटन दास नाबाद 59 आणि नजमुल हसन शांतो सात धावांवर खेळत होते.

पावसानंतर खेळ सुरू होताच भारताला मोठा ब्रेकथ्रू मिळाला. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलने थेट थ्रोवर लिटन दासला धावबाद केले. लिटनने 27 चेंडूत 60 धावा केल्या. बाद झाल्यानंतर शकीब अल हसन क्रीजवर आला. यावेळी बांगलादेशची धावसंख्या आठ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 74 होती. मोहम्मद शमीने बांगलादेशला दुसरा धक्का दिला. त्याने 10व्या षटकातील पहिल्या चेंडूवर नजमुल हुसेन शांतोला बाद केले. शांतोने 25 चेंडूत 21 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने त्याचा झेल पकडला.

अर्शदीपचा डबल धमाका…

अर्शदीप सिंगने बांगलादेशला तिसरा धक्का दिला. त्याने 12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अफिफ हुसेनला सूर्यकुमार यादव करवी त्याला झेलबाद केले. ऑफिफने पाच चेंडूत तीन धावा केल्या. याच षटकात अर्शदीपने बांगलादेश संघाला मोठा झटका दिला. त्याने पाचव्या चेंडूवर शकिब अल हसनला माघारी धाडले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात शाकिबला दीपक हुडाने झेलबाद केले. शाकीबने 12 चेंडूत 13 धावा केल्या. यावेळी बांगलादेशची धावसंख्या 12 षटकांत 4 बाद 101 होती.

हार्दिकला दुहेरी यश

हार्दिकने 13 व्या षटकाच्या दुस-या चेंदूवर यासिर अली आणि पाचव्या चेंडूवर मोसाद्देक हुसेनला बाद करून बांगलादेशला दुहेरी झटके दिले. यासिर अलीने तीन चेंडूत एक धाव काढली. त्याचा झेल अर्शदीप सिंगने पकदला. त्याच्यानंतर मोसाद्देक हुसेन तीन चेंडूत सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिकने त्याला क्लीन बोल्ड केले.

भारताची खराब सुरुवात

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल-विराट कोहली यांनी फटकेबाजीकरत भारताचा डाव सांभाळला आणि दोघांनी 67 धावांची भागिदारी केली. राहुल अर्धशतक (50) झळकावून लगेचच माघारी परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार आणि कोहलीमध्ये 38 धावांची भागीदारी झाली. सूर्याने 187 च्या स्ट्राईक रेटने 30 धावा केल्या आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर हार्दिक पंड्या काही खास करू शकला नाही. तो अवघ्या 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने कोहलीची जेमतेम साथ दिली. पण कोहलीच्या चुकीच्या कॉलमुळे कार्तिक 7 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलही 7 धावा करून माघारी परतला. अखेरच्या षटकांमध्ये विराट आणि आर अश्विनने फटकेबाजी करत संघाला 184 धावांपर्यंत पोहचवले. बांगलादेशच्या हसन महमूदने 3 तर शाकीब अल हसनने 2 विकेट घेतल्या.

दीपक हुडाऐवजी अक्षर पटेलला संधी

आजच्‍या सामन्‍यात टीम इंडियात एक बदल करण्‍यात आला आहे. दीपक हुडाऐवजी अक्षर पटेलला संधी देण्‍यात आली आहे, अशी माहिती कर्णधार रोहित शर्माने दिली.

मागील सामन्‍यात भारताला दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले होते. त्‍यामुळे टीम इंडियाचे सेमीफायनलपर्यंत पोहचण्‍याचे समीकरण थोडे बिघडले आहे. मात्र आजचा विजय हा सेमीफायनलचा मार्ग सुकर करणारा ठरणार आहे. टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्‍यात सहा वर्षानंतर सामना होत आहे. २३ मार्च २०१६ रोजी टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत झालेल्‍या सामना बांगलादेशनने केवळ एका धावावर जिंकला होता. या पराभवामुळे भारतीय संघावर स्‍पर्धेतूनच बाहेर पडण्‍याची नामुष्‍की ओढावली होती. त्‍यामुळे २०१६ मधील पराभवाची परतफेड म्‍हणूनही आजच्‍या सामन्‍याकडे पाहिले जात आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्‍मद शमी, अर्शदीप सिंह

बांगलादेश संघ : शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसैन शंटो, लिटन दास, अफिफ हुसैन, नूरुल हसन, मोसादेक हुसैन, यासिर अली, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्‍लाम, हसन महमूद.

SCROLL FOR NEXT