Latest

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, मुंबई इंडियन्सच्या 22 वर्षीय खेळाडूला संधी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही (South Africa Cricket Team) अगामी T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून तेंबा बावुमाकडे संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जूनमध्ये भारत दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेदरम्यान बावुमाला दुखापत झाली होती, पण आता तो संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्याना बावुमा दुखापतीमुळे संपूर्ण इंग्लंड दौऱ्याला मुकला होता. तथापि, तो आता तंदुरुस्त आहे आणि भारत दौऱ्यावर खेळल्या जाणार्‍या आगामी T20 आणि एकदिवसीय मालिकेत तो खेळेल अशी अपेक्षा आहे.

संघाचा स्टार फलंदाज रॅसी व्हॅन डर ड्युसेन दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना ड्युसेनच्या बोटाला दुखापत झाली होती. उपचारासाठी तो मयदेशी परतला. शस्त्रक्रियेनंतर किमान सहा आठवडे मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. त्याने T20 आंतरराष्ट्रीयमध्ये 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. (T20 World Cup)

दुसरीकडे 22 वर्षीय युवा खेळाडू ट्रिस्टन स्ट्रॉब्स टी-20 विश्वचषक स्पर्धेतून पदार्पण करणार आहे. स्ट्रॉब्सने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना चांगले प्रदर्शन केले होते. दुसरीकडे कोलपाक डीलमधून परतलेल्या रिले रुसो आणि वेन पारनेल यांनाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय अलीकडच्या काळात सलामीवीर म्हणून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रीझा हेंड्रिक्सला अंतिम 15 मध्ये स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर वेगवान गोलंदाजीत कागिसो रबाडा, एनरिक नोर्टजे आणि लुंगी एनगिडी या त्रिकुटाचाही समावेश करण्यात आला आहे. तर तबरेज शम्सी आणि केशव महाराज फिरकीची जादू दाखवतील. सहा वर्षांनंतर द. आफ्रिकेच्या संघात पुनरागमन करणारा 32 वर्षीय स्फोटक फलंदाज रिले रोसोही विश्वचषकाचा भाग असणार आहे. (T20 World Cup)

T20 विश्वचषक स्पर्धेचे अयोजन ऑस्ट्रेलियात…

आठवी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. यजमान ऑस्ट्रेलिया 22 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पण त्याआधी ऑस्ट्रेलियन संघ सप्टेंबरच्या अखेरीस टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. (T20 World Cup)

दक्षिण आफ्रिका संघ :

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेन्रिक क्लासेन, रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रोसो, तबरेझ शम्सी.

राखीव खेळाडू : ब्योर्न फोर्टुइन, मार्को यानसेन आणि अँडिले फेहलुकवायो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT