Latest

Sydney Cricket Ground : सिडनी मैदानाच्या गेटला सचिन, लाराचे नाव

Shambhuraj Pachindre

सिडनी; वृत्तसंस्था : महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी) येथे त्याच्या नावाच्या गेटचे अनावरण करण्यात आले. सचिन सोमवारी 50 वर्षांचा झाला. त्याने एससीजीवर पाच कसोटी सामन्यांमध्ये 157 च्या सरासरीने 785 धावा केल्या. त्यात नाबाद 241 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. (Sydney Cricket Ground)

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आता खेळाडू लारा-तेंडुलकर गेटमधून मैदानात प्रवेश करतील. या दोन्ही गेटवर एक फलकही लावण्यात आला आहे, ज्यावर या दोन खेळाडूंच्या कामगिरीचे आणि एससीजीमधील त्यांच्या विक्रमांचे वर्णन केले आहे. तेंडुलकरने एससीजीला भारताबाहेरील त्याचे आवडते क्रिकेट मैदान म्हटले होते. याच मैदानाकडून त्याला हे गिफ्ट मिळाले आहे. (Sydney Cricket Ground)

एससीजीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सचिन सिडनी क्रिकेट ग्राऊंड हे भारताबाहेर माझे आवडते मैदान आहे, असे नेहमी म्हणतो. 1991-92 च्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यापासून त्याच्या काही खास आठवणी एससीजीशी जोडलेल्या आहेत. तसेच ब्रायन लाराच्या 277 धावांच्या खेळीला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ब्रायन लाराच्या नावाच्या गेटचे अनावरणही येथे करण्यात आले. या दोन्ही गेटस्चे अनावरण एससीजीचे अध्यक्ष रॉड मॅकगिओच आणि सीईओ केरी माथेर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांच्या हस्ते करण्यात आले.

'माझ्या आणि माझा चांगला मित्र ब्रायन लारा यांच्या नावावर असलेल्या एससीजीमध्ये प्रवेश करण्यासाठी खेळाडू गेटचा वापर करतील हा मोठा सन्मान आहे. याबद्दल मी एससीजी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानतो. लवकरच एससीजीला भेट देईन.'
– सचिन तेंडुलकर

'सिडनी क्रिकेट ग्राऊंडकडून मिळालेल्या या ओळखीमुळे मी खूप सन्मानित आहे आणि मला खात्री आहे की सचिनलाही असेच वाटत असेल. माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या या मैदानाच्या खास आठवणी आहेत आणि जेव्हाही मी ऑस्ट्रेलियात असतो तेव्हा मला या मैदानाला भेट दिल्यावर आनंद होतो.'
– ब्रायन लारा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT