Latest

गूळ-साखरेचा गोडवा महागला ! या कारणांमुळे वाढला गुळाचा दर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उसाचा तुटवडा आणि गुर्‍हाळावर कामगार मिळत नसल्याने गुळाचे उत्पादन घटून दरवाढ झाली आहे. त्याचवेळी साखरेचेही दर वाढत असल्याने सर्वसामान्यांसाठी गूळ आणि साखरेची गोडी महागली आहे. ऊसतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने उसाचा निर्माण झालेला तुटवडा, तसेच गुर्‍हाळावर काम करण्यासाठी कामगार उपलब्ध होत नसल्याचा परिणाम गुळाच्या उत्पादनावर झाला आहे. राज्यातील 70 ते 80 टक्के गुर्‍हाळे बंद पडल्याने गुळाचे उत्पादन कमी झाले आहे. बाजारात गुळाची आवक घटली आहे.

अक्षयतृतीया व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुळाला मागणी मोठी असल्याने भाव 60 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात यंदा ऊस तोडणी यंत्राद्वारे तोड झाली. याखेरीज माणसांकडूनही उसाच्या तोडीचा वेग मोठा राहिल्याने मार्च महिन्यात ऊस संपल्याचे चित्र आहे. परिणामी, कोल्हापूर, कराड व लातूर भागातील गुळाचा हंगामही लवकर आटोपला आहे.

दर वर्षी दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात गुळाचा हंगाम बाराही महिने चालू असतो. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून बंद असलेला भीमा-पाटस कारखाना सुरू झाल्याने याठिकाणी यंदा मोठ्या प्रमाणात ऊस पाठविण्यात आला. याखेरीज, दौंड साखर कारखान्यालाही ऊस मोठ्या प्रमाणात गेला. त्याचा परिणाम गुळाच्या उत्पादनावर होऊन बाजारातील आवक एरवीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांनी घटली आहे.

परराज्यातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तसेच गुजरात भागातही गुर्‍हाळे मोठ्या प्रमाणात चालतात. मात्र, एप्रिल महिन्यात या ठिकाणचा हंगाम संपला आहे. त्यामुळे, येथूनही अक्षयतृतीया व रमजान ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील गुळाला मागणी होत आहे. मात्र, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने गूळ तेजीकडे झुकला आहे.

सध्या गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागील पंधरा दिवसांत गुळाच्या भावात क्विंटलमागे 700 ते 800 रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, गुळाचे भाव प्रतवारीनुसार 3 हजार 600 ते 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर, मागील वर्षी 40 ते 50 रुपये किलो दराने उपलब्ध असलेला गूळ आज 50 ते 60 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

साखर चाळीशीजवळ
राज्यात साखरेच्या दरात दोन दिवसांत क्विंटलला पुन्हा 50 ते 100 रुपयांनी वाढ होऊन दर 3700 रुपयांवर पोहोचला आहे. मागणीच्या तुलनेत एप्रिल महिन्यासाठी 22 लाख टनांचा दिलेला साखरेचा कोटा कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त 2 ते 3 लाख टनांचा कोटा खुला न केल्यास साखरेचा क्विंटलचा घाऊक दर 4 हजार रुपयांवर पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या आठवड्यापेक्षा साखरेच्या निविदा क्विंटलला सरासरी 75 रुपयांनी पुन्हा वधारून त्या 3400 ते 3450 रुपयांवर पोहोचल्या आहेत.

तर, घाऊक बाजारातील साखरेचा दरही क्विंटलला पन्नास ते शंभर रुपयांनी वाढून 3 हजार 700 रुपयांवर पोहोचल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. यात्रा, जत्रा, वाढत्या उन्हाळ्यामुळे थंडपेय, शीतपेयांच्या वाढलेल्या मागणीमुळे साखरेच्या तेजीला हातभारच लागत आहे. कारखान्यांनी साखर विक्रीस हात आखडता घेतला असताना दुसरीकडे सट्टेबाजांची खरेदीमध्ये वाढलेली सक्रियता हेसुद्धा साखर दरवाढीचे एक प्रमुख कारण सांगितले जात आहे.

कारखान्यांकडून निविदांचा दर सकाळी एक आणि सायंकाळच्या निविदांमध्ये तो आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशकडे राहणारी साखरेची मागणी महाराष्ट्राकडे वळल्यामुळे दरवाढ सुरूच आहे. त्यामुळे केंद्राने तत्काळ अतिरिक्त कोटा खुला करण्याची मागणी होत आहे. अन्यथा दरवाढ सुरूच राहण्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तविला.

निविदांमध्ये खरेदी केलेल्या साखरेपोटी कारखान्यांना ऑनलाईनद्वारे रक्कम जमा केली जाते. मात्र, बँकांना असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे साखरेचा पुरवठा विस्कळित होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, किरकोळ बाजारात साखरेचा प्रतिकिलोचा दर काही भागांत 37 रुपये 50 पैसे ते 39 रुपयांवर पोहोचला आहे. ग्रामीण भागात वाहतुकीसह येणारा अन्य दर पाहता हा दर अधिक राहण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT