Latest

‘स्वाभिमानी’ आजपासून साखर वाहतूक रोखणार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षीच्या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 रुपये जादा दिल्याशिवाय साखर कारखान्यांची धुराडे तर पेटू देणार नाहीच; त्याचबरोबर मंगळवार (दि. 3) पासून कारखान्यातून साखरदेखील बाहेर जाऊ देणार नाही. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील 37 तसेच कर्नाटकातील साखर कारखान्यांवर पदयात्रा काढून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

400 रुपये जादा देण्याच्या मागणीबाबत 2 ऑक्टोबरपर्यंत साखर कारखान्यांनी भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याला कारखान्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कारखान्यांसमोर ढोल वाजवून साखर कारखानदारांना जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापूर्वीदेखील टनाला 400 रुपये देणे कसे शक्य आहे ते आपण साखर आणि उपपदार्थांपासून मिळणार्‍या उत्पन्नाच्या दराचे गणित मांडून सांगितले आहे.

पुण्यातील चार साखर कारखाने 400 रुपये जादा देऊ शकतात; मग अन्य कारखान्यांना काय अडचण आहे, असा सवाल करून शेट्टी म्हणाले, एफआरपीची रक्कम ठरविताना 3100 रुपये साखरेचा भाव गृहीत धरण्यात आला होता. मे महिन्यापासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज प्रत्यक्षात 3800 रुपये प्रति क्विंटल साखरेचा भाव आहे. त्यामुळे दसर्‍यापुर्वी प्रति टनाला जादा 400 रुपये शेतकर्‍यांना देण्यासाठी शासनाने लक्ष घालावे. यासाठी आपण आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.

आत्मक्लेश आंदोलनामुळे तरी कारखानदारांना शेतकर्‍यांना त्यांच्या घामाची रक्कम देण्यासाठी दया येईल. दत्त सहकारी साखर कारखान्यापासून (शिरोळ) आंदोलनास सुरुवात होईल. दि. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपुरात या आंदोलनाची सांगता होईल. चंदगड, गहिंग्लज, आजरा तालुक्यातील साखर कारखान्यांवर राजेंद्र गड्ड्यानवार, प्रा. जालंदर पाटील तांबाळे येथून तर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांवर महेश कराडे पदयात्रा काढतील. कर्नाटकातील साखर कारखान्यांवरही कर्नाटक राज्य रयत संघ व स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी प्रा. जालंदर पाटील, राजेंद्र गड्ड्यानवार आदी उपस्थित होते.

बावीसावी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी

ऊस परिषदेचे हे 22 वे वर्ष आहे. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे ही परिषद होणार आहे. यादिवशी आत्मक्लेश आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे. यामध्ये यावर्षीचा ऊस दर व पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल.

SCROLL FOR NEXT