Latest

मुकादमांकडून ऊस वाहतुकदारांची 448 कोटींची फसवणूक: राजू शेट्टी

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मुकादमांनी राज्यातील ऊस वाहतुकादरांची तब्बल 448 कोटींची फसवणूक केली आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेत साखर आयुक्तालयामार्फत फसवणूक करणाऱ्या मुकादमांची यादी जाहीर करावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजु शेट्टी यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात माजी खासदार शेट्टी यांनी थकीत एफआरफी आणि ऊस वाहतुकदारांची झालेली फसवणूक याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातमध्ये जे ऊस वाहतुकदार आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणावर मुकादमांकडून फसवणूक झाली आहे. राज्यात एकूण 448 कोटींची फसवणूक झाली आहे. हा जो ऊस वाहतुकदार करणारा वर्ग आहे, तो छोटा शेतकरी आहे. शेतामधे मशागतीसाठी घेतलेला ट्रँक्टर कारखाने सुरू झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून ऊस वाहतुकीसाठी लावत असतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पादनामधून उपजीविका करीत असतो. एक- दोन एकर शेती असलेला हा शेतकरी ऊसाची वाहतुक करतो. आणि बाहेरून ऊसतोड मजुर पुरविणारा मुकादम हे 20 लाख ते 25 लाख रूपये बिनव्याजी अ‍ॅडव्हास घेत असतात. हे मुकादम अ‍ॅडव्हास घेऊन आणि करार केल्यानंतरही मजुर पुरवित नाहीत. त्यामुळे फसवणूक होत आहे. परिणामी राज्यात गेल्या दोन वर्षात सुमारे सात ते आठ ऊस वाहतूकदारांनी आत्महत्या केली आहे. या ऊस वाहतुकदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाय सरकारने करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

एफआरपीबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यातील कारखान्यांनी 92 टक्के एफआरफी दिली आहे. मात्र आठ टक्के एफआरफी थकीत आहे. त्या कारखान्यांना नोटीसा पाठवा. साखर कारखान्यांवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे कारखान्यांनी एक रकमी दिली पाहिजे. वेळेवर एफआरपची रक्कम न दिल्यास त्यांच्याकडून 15 टक्के व्याजाने रक्क्कम वसुल करावी. तसे न झाल्यास आम्हांला आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

SCROLL FOR NEXT