Latest

कोपरगावच्या एमपीएससी उत्तीर्ण तरुणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू

अमृता चौगुले

वेल्हे/पुणे : पुढारी वृत्तसेवा अहमदनगर जिल्ह्यातील उच्च शिक्षित बेपत्ता तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. राजगड किल्ल्यावर जाणार्‍या दुर्गम मार्गावर गुंजवणे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत सतीचा माळाजवळ सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह रविवारी (दि. 19) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आढळला. दर्शना दत्ता पवार (वय 26, रा. कौलणी, महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, सहजानंद नगर, ता. कोपरगाव, जिल्हा अहमदनगर) असे तिचे नाव आहे. ती उच्चशिक्षित असून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिची वनअधिकारी पदावर निवड झाली होती. दरम्यान, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

दर्शना हिचा मृतदेह राजगडाच्या दुर्गम मार्गालगतच्या वडाच्या ओहळात आढळला. छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह असल्याने सुरुवातीला ओळखही पटली नाही. मृतदेहावर जवळ सापडलेल्या मोबाईल फोनवरून पोलिसांना ओळख पटविण्यात यश आले. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहा-सात दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असल्याने चेहर्‍यासह मृतदेह सडून गेला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वेल्हे पोलिसांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात 9 जून रोजी दर्शना पुण्यातील एका अकादमीने आयोजित केलेल्या सत्कारासाठी पुण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी 10 जून रोजी दुपारी चार वाजेपर्यंत ती घरच्यांच्या संपर्कात होती. त्यानंतर तिने फोन घेतला नसल्याने वडील दत्ता पवार हे 12 जून रोजी स्पॉट लाईट अ‍ॅकॅडमीत चौकशीसाठी आले. त्या वेळी राहुल दत्तात्रय हंडोरे याच्यासोबत ती सिंहगड-राजगडावर फिरण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली.

दर्शना हिचा संपर्क होत नसल्याने वडिलांनी त्याच दिवशी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती, असे वेल्हे पोलिस ठाण्याचे अंमलदार औदुंबर आडवाल यांनी सांगितले. दरम्यान, मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, ठाणे अंमलदार औदुंबर, हवालदार योगेश जाधव, अजय शिंदे, पोलिस पाटील बाळासाहेब रसाळ, बाळू पवार, ज्ञानदीप दिवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे हवालदार योगेश जाधव तपास करीत आहेत. मागील काही दिवसांत ती नेमकी कोणाच्या संपर्कात होती, कोणाबरोबर ती राजगड किल्ल्याच्या परिसरात गेली होती, यादृष्टीने ग्रामीण व पुणे शहर पोलिसांची पथके तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT