Latest

एमपीएससी उत्तीर्ण तरुणीचा संशयास्पद मृत्यू

Arun Patil

पुणे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील उच्च शिक्षित बेपत्ता तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगड किल्ल्यावर जाणार्‍या दुर्गम मार्गावर गुंजवणे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आढळला.

दर्शना दत्ता पवार (वय 26, रा. सहजानंदनगर, जि. अहमदनगर) असे तिचे नाव आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिची वन अधिकारी पदावर निवड झाली होती. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह असल्याने सुरुवातीला ओळखही पटली नाही. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल फोनवरून पोलिसांना ओळख पटविण्यात यश आले. गेल्या आठवड्यात 9 जून रोजी दर्शना पुण्यातील एका अकादमीने आयोजित केलेल्या सत्कारासाठी पुण्यात आली होती.

दुसर्‍या दिवशी 10 जून रोजी दुपारी चार वाजेपर्यंत ती घरच्यांच्या संपर्कात होती. त्यानंतर तिने फोन घेतला नसल्याने वडील दत्ता पवार हे 12 जून रोजी स्पॉट लाईट अ‍ॅकॅडमीत चौकशीसाठी आले. त्यावेळी राहुल दत्तात्रय हंडोरे याच्यासोबत ती सिंहगड-राजगडावर फिरण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली. दर्शना हिचा संपर्क होत नसल्याने वडिलांनी त्याच दिवशी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती.

SCROLL FOR NEXT