Latest

राज्याची राजकीय संस्कृती भाजपमुळे रसातळाला गेली : सुषमा अंधारे यांची टीका

स्वालिया न. शिकलगार

मानवत (परभणी)

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यात नीती आणि अनीती खेळ संपवून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला नेली. त्यामुळे देवेंद्र पर्व हे राजकीय नीतिमूल्यांच्या ऱ्हासाचे पर्व म्हणून ओळखले जाईल, अशी टीका सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मानवत येथे केली.

येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी ता. ८ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्या पत्रकारांशी अनौपचारिकरित्या त्या बोलत होत्या.

काँग्रेसचाही मुख्यमंत्री होऊ शकतो

प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असे वाटते की, आपला नेता सर्वोच्च स्थानी असावा. त्यामुळे राज्याच्या पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असेच आम्ही म्हणणार. कदाचित भविष्यात काँग्रेसचा नेताही मुख्यमंत्री होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. केसरकर अगोदर सांगतात की, राष्ट्रवादी कॉंग्रेसने हिंदुत्व सोडले म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. मात्र राष्ट्रवादीचे अजितदादा सरकारमध्ये सामील होतात तेव्हा तेच केसरकर अजित पवार यांच्या गाडीमागे धावतात. मुळात केसरकर यांच्या सारख्या लोकांना निष्ठेने कुठे नांदायाचेच नसते म्हणून ते कारणे सांगत असल्याचे त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीचे जागावाटप लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आणखी दोन फेऱ्या होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला कोणत्या पक्षाच्या कोट्यामधून जागा द्यायची, याचा निर्णय झाल्यानंतर जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय जाहीर करतील, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. मात्र ते असे करतील असे वाटत नाही. मात्र त्यांनी भाजपला मदत करण्याचे ठरवले असेल तर सांगता येत नाही.

महिला सुरक्षितता, शेतीमालाला भाव, पीकविमा या प्रश्नाला उत्तर नसल्याने मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवला जात आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT