Latest

Suryakumar Yadav T20 : सूर्यकुमारचे ‘षटकारांचे शतक’; अशी कामगिरी करणारा जगातला दुसरा खेळाडू

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट मंगळवारी (दि. ८) वेस्ट इंडिज विरूध्दच्या सामन्यात दौऱ्यावर आग ओकताना दिसली. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारने ४४ बॉलमध्ये १८८च्या स्ट्राईक रेटने ८३ धावा करत मॅच-विनिंग खेळी केली. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना ७ विकेटने जिंकत मालिकेतील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. (Suryakumar Yadav T20)

सूर्यकुमारचे 'षटकारांचे शतक'

या खेळी दरम्यान सूर्यकुमार यादवने अनेक विक्रम मोडीत काढले. सूर्यकुमारने या सामन्यात अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत सूर्यकुमारने १० चौकारांसह ४ षटकार ठोकले. यासह सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये १०० षटकारांचे शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतरचा तिसरा खेळाडू आहे. (Suryakumar Yadav T20)

सर्वात जलद षटकारांचे शतक ठोकणारा जगातील दुसरा खेळाडू

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० षटकार पूर्ण करणारा सूर्यकुमार यादव भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमारने आपल्या ५० व्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला. रोहित शर्माने ९२ व्या सामन्यात तर कोहलीने १०४ व्या सामन्यात ही कामगिरी केली होती. याशिवाय सूर्यकुमार यादव हा जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १०० षटकार पूर्ण करणारा एविन लुईसनंतरचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

वेस्ट इंडिजच्या भूमीत सर्वाधिक अर्धशतके झळकवणारा खेळाडू

सूर्यकुमार यादवची तिसऱ्या टी-20 सामन्यात ८३ धावांची खेळी ही कॅरेबियन भूमीवरील त्याची दुसरी टी-20 आंतरराष्ट्रीय खेळी होती. तो वेस्ट इंडिजमध्ये भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याशिवाय विराट, रोहित, ऋषभ पंत आणि तिलक वर्मा यांनी वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी १ टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकवले आहे. त्याचबरोबर सूर्या आता आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT