Latest

Suryakumar Yadav : सूर्यकुमारच्या स्फोटक खेळीची विक्रमाला गवसणी!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav : भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव अप्रतिम क्रिकेट खेळत आहे. गेल्या वर्षी भारतासाठी पदार्पण करणारा सूर्या टी-20 मध्ये संघाचा आघाडीचा फलंदाज बनला आहे. चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याची बॅट सतत धावांचा पाऊस पाडत असते. 2022 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने भारतासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. आज टीम इंडिया या स्पर्धेतील सुपर-12 फेरीतील शेवटचा सामना झिम्‍बाब्‍वे विरुद्ध खेळत आहे. या सामन्यात सूर्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली.

सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) झिम्‍बाब्‍वेच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. अक्षरश: चौफेर फटेबाजी करून त्याने झिम्‍बाब्‍वेच्या फिल्डर्संना एका जागेवर उभे राहू दिले नाही. त्याने 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. यासह सूर्याने 2022 या कॅलेंडर वर्षांतील 1000 धावांचा टप्पा पार केला. टी 20 च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. सूर्यकुमार यादवने आपल्या 28व्या टी-20 डावात हा पराक्रम केला. या कॅलेंडर वर्षात टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1000 धावांचा पल्ला गाठणारा सूर्यकुमार यादव हा जगातील एकमेव फलंदाज आहे. या बाबतीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानने या वर्षात आतापर्यंत 924 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

आत्तापर्यंत फक्त एकाच खेळाडूने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कॅलेंडर वर्षात 1000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने 2021 मध्ये 1326 धावा केल्या होत्या. रिझवानच्या बॅटमधून यंदाही धावा येत आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्यात विराट कोहली सूर्यकुमार यादवनंतर (Suryakumar Yadav) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

SCROLL FOR NEXT