Latest

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असतानाच मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. बुधवारी (६ डिसेंबर) या क्युरेटिव्ह पिटीशनवर म्हणजेच मराठा आरक्षण प्रकरणी दाखल असलेल्या उपचारात्मक याचिकेवर सुनावणी होणार आहे. ६ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात या उपचारात्मक याचिकेचा समावेश करण्यात आला आहे.

मे २०२१ मध्ये न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उपचारात्मक याचिका दाखल करण्यात आली होती. या उपचारात्मक याचिका मुख्यमंत्री महाराष्ट्र विरुद्ध जयश्री लक्ष्मण पाटील आणि विनोद पाटील विरुद्ध जयश्री लक्ष्मण पाटील अशा आहेत. या याचिकांवर आता न्यायालय काय निर्णय घेणार हे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणावर ज्या उपचारात्मक याचिकेवर सुनावणी होणार आहे, ती सुनावणीची वेळ खूप महत्त्वाची आहे. ७ डिसेंबर पासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मराठा आरक्षण प्रकरणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेली वेळ जवळ येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही सुनावणी खूप महत्त्वाची आहे.

गेल्या वीस वर्षात एखाद दुसऱ्या वेळी अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच ज्यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी केली ते सर्व न्यायमूर्ती निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश याची सुनावणी करतील. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यासमोर ही सुनावणी होईल. विशेष म्हणजे ही सुनावणी खुल्या न्यायालयात होणार नाही तर विशेष कक्षात होईल.

SCROLL FOR NEXT