Latest

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात शोमा सेन यांना सशर्त जामीन

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात कथित माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून गेल्या सहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या शोमा सेन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

शोमा सेन यांच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा १९६७ (युएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करून ६ जून २०१८ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्या तुरुंगात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस व न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीत शोमा सेन या ६२ वर्षे वयाच्या असून त्यांना विविध आजार असल्याने आम्हाला त्यांच्या कोठडीची गरज नाही, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

त्यावर न्यायमूर्तींनी शोमा सेन यांना काही शर्तींवर जामीन मंजूर केला. सेन यांनी विशेष सत्र न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय राज्याबाहेर जाऊ नये, आपला पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करावा, निवासी पत्ता, मोबाईल क्रमांक अशी सर्व माहिती देऊन मोबाईलमध्ये जीपीएस लोकेशन सुरु ठेवावे, अशा अटी लादून न्यायालयाने सेन यांना जामीन मंजूर केला. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल घडली होती. या प्रकरणात १६ आरोपींना अटक झाली असून त्यातील सहा जणांना जामीन मंजूर झाला आहे.

SCROLL FOR NEXT