Latest

Ajit Pawar Politics : अजित पवारांची कुरघोडी, ‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरेंची निवड

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी नव्याने संघटनात्मक नियुक्त्या केल्या असून पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुनील तटकरे यांची निवड केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

पटेल पुढे म्हणाले की, 'राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड केली आहे. कुणावरही अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पद मुक्त करण्यात येत आहे. राज्यातील नव्या नियुक्त्यांना तटकरे यांना सर्व अधिकार असतील. अनिल पाटील प्रतोद पदी कायम राहतील,' असा त्यांनी खुलासा केला.

सुनील तटकरेंनी यावेळी लगेचच नव्याने निवडी करण्यात आलेल्यांची नावे जाहीर केली. यावेळी ते म्हणाले, मला प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे. पक्ष सत्तेत नव्हता तेव्हा आम्ही पक्ष मजबूत केला. 5 तारखेला आम्ही एमईटी कॉलेजमध्ये सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. विविध स्तरावरचे पदाधिकारी यासाठी उपस्थित राहतील असा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काही नियुक्त्या केल्या. महिला अध्यक्षपदी रुपाली चाकणकर, युवक कांग्रेसपदी सूरज चव्हाण तर प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी यांची निवड केल्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी काम करत राहू : अजित पवार

महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही सर्व एकत्र काम करणार आहे. आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हितासाठी करतोय. कुणावरही अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. पक्ष, चिन्ह आमच्या सोबत आहे. एकाच व्यक्तीला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही. पण असे करण्यात आले आहे. मात्र हे काम विधानसभा अध्यक्षांचे असते. ज्या पक्षाच्या सदस्यांची संख्या जास्त असते त्यांची नेमणूक विधानसभा अध्यक्ष करत असतात. मात्र आमच्या आमदारांमध्ये भीती निर्माण व्हावी या साठी काही निर्णय घेतले जात आहेत. यासंदर्भात बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. आम्ही पुढेही काम करत राहू, एनसीपीच्या बळकटीसाठी काम करत राहू, असे अजित पवार यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT