Latest

कोल्हापूर : उद्या प्रचाराचा सुपरसंडे

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी (दि. 5) संपणार आहे. शेवटचा दिवस उमेदवारांच्या हातात असल्यामुळे रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी प्रचार सभेबरोबरच पदयात्रा व मोटारसायकल रॅली अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याने प्रचाराचा हा सुपरसंडे ठरणार आहे. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे.

कोल्हापुरात पंचवीस वर्षांनी काँग्रेस पक्ष चिन्हावर निवडणूक लढवत आहे, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रथमच मशाल चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरला आहे. महिन्याभरापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांचे आयोजन करून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या प्रचाराची यंत्रणा कार्यरत ठेवून मतदार मतदान करेपर्यंत आपली छाप पडावी, यासाठी सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करणारी यंत्रणा सज्ज झाली आहे.

कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवसेना 'उबाठा' पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर सभा घेऊन वातावरण ढवळून काढले. रविवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या प्रचाराचा वेग वाढणार आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचार फेरी तसेच भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT