Latest

पावसाअभावी उसाचे उत्पन्न होणार कमी; साखर कारखान्यांना उसासाठी करावी लागणार कसरत

अमृता चौगुले

नानगाव : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसणार आहे. पावसाच्या पाण्यावर उसाचे पीक चांगले येते, तर उत्पन्नातदेखील वाढ होते. मात्र, यंदाच्या वर्षी वेळेवर पाऊस झाला नाही. परिणामी, यंदा उसाच्या उत्पन्नात घट होणार असल्याची वस्तुस्थिती आहे.

दौंंड तालुक्याला मुळा-मुठा आणि भीमा या नद्या वरदान ठरल्या आहेत. नद्यांमुळे दौंंड तालुक्यातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आल्याने हा भाग तालुक्यात बागायती व सुजलाम-सुफलाम म्हणून प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे ऊस आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला उसाच्या लागणी होतात आणि त्याच काळात पावसाला सुरुवात होते. जून महिन्यातील पावसाच्या पाण्यावर होणार्‍या लागणींची उगवण क्षमता चांगली असते. मात्र, यंदा पावसाने दडी मारली असून, पावसाचे महत्त्वाचे पावणेतीन महिने उलटले तरीदेखील चांगला पाऊस झालेला नाही.

पुणे जिल्ह्यातील डोंगर भागात व धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने त्या भागातील धरणांचा पाणीसाठादेखील कमी असून, यंदा नदीपात्रांना मोठ्या प्रमाणावर पाणीदेखील आले नाही. उलट, ऐन पावसाळ्यात नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होताना दिसून येत असून, नदीपात्र काही ठिकाणी कोरडे पडू लागले आहे. पाऊस नाही आणि परिणामी नद्यांना पाणी नसल्याने यंदाच्या वर्षी शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न शेतकरी बळीराजापुढे उभा राहणार आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाचे उत्पन्न घटणार असून, पाण्याअभावी शेतकरी लवकरच ऊस गुऱ्हाळांना देतील. त्यामुळे यंदाच्या वर्षी कारखान्यांना उसासाठी धावाधाव करावी लागणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत. मुबलक पाणी मिळाले नाही तर आपोआपच उसाखालचे शेतीक्षेत्र कमी होणार आणि उसाचा पुरवठादेखील कमी होणार हे नक्की.

आता पाऊस होणे अत्यंत गरजेचे
येणार्‍या काळात धरणक्षेत्रात पाऊस झाला, तर धरणे भरली जातील. याच काळात काही पाणी उजनीकडे पाठवले जाते. हे पाणी सरळ उजनी धरणात जावे यासाठी त्या काळात नदीकाठच्या शेतकर्‍यांना वीज मिळत नाही. त्यामुळे पाणी असूनदेखील शेतीपिकांना देता येत नाही. त्यामुळे आपल्या भागातदेखील पाऊस होणे गरजेचे आहे.

बर्‍याच ठिकाणी भीमा नदीपात्रातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. पाऊस झाला नाही तर जून महिन्यात लागणी झालेल्या ऊस पिकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. सध्या मोठे असलेल्या उसाच्या उत्पन्नातदेखील घट होणार आहे.
                                                         पांडुरंग ताकवणे, ऊस उत्पादक शेतकरी. 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT