Latest

ऊस उत्पादन कमी; साखर उतारा मात्र भारी

Arun Patil

कोल्हापूर : राज्यात यावर्षी ऊस उत्पादनात 20 लाख टनाने घट झाली आहे. पण या हंगामात साखर उतारा गतवर्षीपेक्षा 0.20 टक्के (10.17 टक्के) वाढला असून साखर उत्पादन 1039.87 लाख क्विंटल झाले आहे. गतवर्षीपेक्षा सुमारे 50 हजार क्विंटल जादा साखर उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागात मात्र गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 3 लाख टन उसाची वाढ झाली असून साखर उत्पादन 5 लाख क्विंटलने वाढले आहे. विभागाचा साखर उतारा 11.5 टक्के आहे. तसेच यावर्षी विभागात गतवर्षी 36 कारखाने सुरू होते, यावर्षी 40 सुरू झाल्याचे साखर आयुक्तांच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या खरीप हंगामात कमी पाऊस झाल्याने ऊस वाढीसाठी मोठा फटका बसला. त्यामुळे ऊस उत्पादनात 20 ते 25 टनाने घट होईल, असे सरकारला वाटत होते. त्यामुळे कारखाने लवकर सुरू करा, अशाही सूचना साखर आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या. मात्र गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस एक आठवडाभर झाला. त्यामुळे हंगाम एक महिना वाढला.

राज्यात 15 नोव्हेंबरपासून कारखाने सुरू झाले. कारखाने सुरू झाल्यानंतर बिगर हंगामी पाऊस होत होता. त्यामुळे गाळप हंगामात थोडा व्यत्यय निर्माण होत असे. त्याच्या परिणामी उसाचे वजन वाढत असे. पण यावर्षी गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर एकही दिवस पाऊस झाला नाही. तसेच डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे ऋतुचक्र होते. त्याचा परिणाम साखर उतारा वाढण्यावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT