पुणे, पुढारी वृत्तसेवा: सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर पहिल्याच दिवशी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार घेऊन एक गृहस्थ आले. 'पाइपलाइन, विहीर की पाण्याच्या टाकी तयार करण्यात नेमका भ्रष्टाचार कशात झालाय?' अशी विचारणा केली असता समोरून उत्तर आले की, 'साहेब तेच तर तुम्हाला शोधायचंय…' प्रशासनातील असेच खुमासदार किस्से ऐकवून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सभागृह अक्षरश: खळखळून हसविले.
वेस्ट इंडियन शुगर मिल्सच्या (विस्मा) वतीने त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता कार्यक्रमात शुक्रवारी त्यांनी 36 वर्षांच्या कारकिर्दीतील प्रशासनातील घटनांवर प्रकाश टाकला. सांगली येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हरलेल्या त्या उमेदवाराने भ्रष्टाचाराबाबत कोर्या कागदावर अर्ज करतो म्हणून केबिनबाहेर पडले, ते मी अडीच वर्षे असेपर्यंत पुन्हा माझ्याकडे फिरकलेच नाहीत, असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
विविध पदांवर काम करीत असताना काही वेगळे अनुभव आले. काही राजकीय नेत्यांनी गायकवाड हे चांगले काम करतात. पंरतु, पब्लिकमध्ये जाऊन भाषणे करू नका, असा निरोप आला होता. कारण, आम्हाला कोण बोलवणार? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकर्यांनी बोलवल्याने मी मंचावर जाऊन भाषणे करण्यात माझा काहीच दोष नव्हता. परंतु, त्याचा मला फटकाही बसल्याचे ते म्हणाले. शाहूवाडीत काम करीत असताना तेथील शिपाई मामलेदारकडील फाईल नायब तहसीलदाराकडे नेऊन द्यायचा. त्या दोघांमध्ये बाहेरच्या बाजूला एके ठिकाणी देशी दारूची बाटली ठेवली होती, पहिला तो तिकडे जायचा आणि नंतर पुढे फाईल न्यायचा, यावरही सभागृहात हास्याची लकेर उमटली.
सांगली जिल्हाधिकारी म्हणून माझी बदली झाल्यानंतर मी तेथून एक बुकलेट करून सर्व आमदारांना पाठविले होते. जनतेला कामाचा हिशेब देणे आणि कोणते चांगले काम केले, हे सांगणे ही खरी लोकशाही आहे. या लोकशाहीपर्यंत आपण पोहचलोच नाही. याउलट लोकांना कमी माहिती मिळावी, यावर भर दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मी 'शेतकर्यांनो सावधान' हे 116 मुद्दे असलेले पुस्तक 1996 साली लिहिले. साधा, सोपा वेदांत लिहून शेतकर्यांना दिला. मात्र, शेतकरी हुशार, शहाणा झाला तर काय? तलाठ्यांचे मूल्य कमी होईल, या विवंचनेतून कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याकडील 600 पुस्तके तलाठ्यांनी खरेदी केली आणि हे पुस्तक पुढे जाणार नाही अशी खबरदारी घेतल्याची माहिती त्यातील एका तलाठ्याने दिल्याची आठवण सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
मी काम केलेल्या ठिकाणचे लोक 35 वर्षांनंतर आजही संपर्कात आहेत. सुख-दुःखातील हितगुजही सांगतात. त्यामुळे सरकारी नोकरीत कामापुरते संबंध ठेवण्यापेक्षा शेतकरी आणि लोकांमध्ये मिसळून कष्टाने काम केल्यावर आजच्यासारखा कृतज्ञता सोहळा एखाद्याच्या वाट्याला येतो. कष्टाच्या रस्त्यामुळेच मला आज हे भाग्य लाभल्याचे नमूद करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.