Latest

पीएसआय भरतीच्या शारीरिक चाचणीत अचानक बदल; मुलींना मोठा फटका

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसेवा आयोगाने मुलींच्या शारीरिक चाचणीत केलेल्या बदलाचा फटका परीक्षार्थीना बसला आहे. मुलींचा राखीव कोटा ११२ असताना फक्त पन्नास टक्के मुलीच पात्र झाल्या आहेत. शिल्लक जागा पुन्हा मेरीटने मुलींना मिळाव्यात, या मागणीसाठी आझाद मैदानावर राज्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील मुलींनी धरणे आंदोलन केले.

२०२१ मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची २०२३ साली २ व ३ नोव्हेंबरला शारीरिक चाचणी पात्रता परीक्षा घेतली. पोलीस भरतीसाठीही लांब उडी रद्द केली असतानाही आयोगाने २०२३ साठी शारीरिक चाचणीचे निकष बदलून मुलींना ४ मीटर लांब उडी ४०० मीटर धावण्यासाठी १:१५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. इतर राज्यात १:३० मिनिटे इतका वेळ देण्यात येतो या प्रक्रियेत मुलांसाठी ८०० मीटर धावण्यासाठी २:३० मिनिटांच्या तुलनेत १: १५ मिनिटे वेळ कमी आहे. पुरुष व महिला उमेदवार यांची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्याचबरोबर भरती प्रक्रियेत यावर्षी लावण्यात आलेली ४ मीटर लांब उडीची अट अत्यंत जाचक आहे. या अटी रद्द करण्याची मागणी आंदोलनाला बसलेल्या मुलींनी केली आहे. या आंदोलनामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली, नागपूर अमरावती, जालना व बीड या जिल्ह्यांतील विद्यार्थिनींनी मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले आहे. या मुलींनी राखीव कोट्यातील जागा पुन्हा मेरिट लिस्ट लावून भरती करावी अशी मागणी केली आहे.

SCROLL FOR NEXT