Latest

शुक्राणूंना पोहण्याची क्षमता देणार्‍या ‘लेगो प्रोटिन’च्या संरचनेचा अभ्यास

Arun Patil

बर्लिन : संशोधकांनी आता एका अशा प्रोटिनच्या संरचनेवर संशोधन केले आहे ज्याच्यामुळे शुक्राणूंना पोहण्याची क्षमता मिळते. हे प्रोटिन शुक्राणूच्या सेल मेम्ब्रेनमध्ये असते. त्याच्यामुळे पेशीच्या आत व बाहेर धनभारीत सोडियम आणि हायड्रोजन आयन्सची ये-जा होण्यास मदत मिळते. पेशीचा 'पीएच', क्षाराचा अंश आणि आकार यांच्या नियंत्रणामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्याच्यामुळेच पेशी जिवंत व निरोगी राहते. या 'लेगो प्रोटिन'ला डिकोड करण्यात यश आल्याने पुरुषांमधील प्रजननक्षमतेशी संबंधित उपचार तसेच पुरुषांमधील गर्भनिरोधक साधने याबाबत नवे संशोधन होऊ शकते.

जर्मनीतील हिडेलबर्ग युनिव्हर्सिटी बायोकेमिस्ट्री सेंटरमधील जीवशास्त्रज्ञ क्रिस्टीना पॉलिनो यांनी याबाबतची माहिती दिली. शुक्राणूंच्या हालचालींसाठी हे प्रोटिन महत्त्वाचे ठरते. परिणामी पुरुषांमधील प्रजननक्षमतेसाठीही ते महत्त्वाचे ठरते. मानवासह विविध प्राण्यांमध्ये हे प्रोटिन असते. अर्थात ते वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करते. त्याचा प्रामुख्याने सी ऑर्चिन्समध्ये अभ्यास करण्यात आला.

या सागरी जीवातील संशोधनाच्या डाटाचा वापर मानवातील प्रजनन क्षमता किंवा गर्भनिरोधक औषधांमध्ये थेटपणे केला जाऊ शकत नाही; मात्र या अभ्यासातून मानवाशी संबंधित संशोधनाला नवी दिशा मिळू शकते. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT