Latest

मेस दरवाढीविरोधात लातुरात विद्यार्थी रस्त्यावर; तहसीलवर काढला मोर्चा

अमृता चौगुले

लातूर, पुढारी वृतसेवा : खाडगाव रोड परिसरातील मेस चालकांनी अचानक मेसच्या दरात वाढ केल्याने आणि मंगळवारी मेस बंद ठेवल्याने विद्यार्थी संतप्त झाले. तर विद्यार्थ्यांनी याचा निषेध करीत मेससमोर ठिय्या आंदोलन केले. तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला. अचानक निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाची तारांबळ उडाली.

दयानंद महाविद्यालय खाडगाव रोड परिसरात मोठ्या संख्येत विद्यार्थी राहतात. यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहेत. यातील बरेच विद्यार्थी सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. त्यांनी महिनेवारी मेस लावल्या आहेत. दरम्यान सोमवारी रात्री त्या परिसरातील खाडगाव भोजनालय संघटनेने मेसदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी मेसच्या शटरवर फलक लावून १ सप्टेंबर पासून लागू करण्यात येणाऱ्या दराबाबत तसेच अन्य नियमांबाबत माहिती दिली. यानुसार महिनेवारी मेसच्या शुल्कात ४०० रुपयाने वाढ केल्याचे जाहीर झाले.

विशेष म्हणजे मंगळवारी मेस बंद ठेवण्यात आल्याचेही स्वतंत्र फलकातून जाहीर केले. हे फलक पाहून विद्यार्थ्याना संताप चढला. विशेष म्हणजे आपण ऑगस्ट महिन्याचे मेसचे पैसे दिले आहेत त्यामुळे मेसवर जेवन मि‌ळेल असे काही विद्यार्थ्यांना वाटले. त्यामुळे ते दुपारचे जेवन घेण्यासाठी मेसवर आले असता त्या बंद असल्याचे आढळल्याने ते नाराज झाले अन् त्यांनी या मेससमोर ठिय्या दिला. मेसवाल्यांनी लावलेल्या फलकाला काळे फासले भाववाढी विरोधात घोषणा दिल्या. यातील काही विद्यार्थ्यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन द्यावे असे ठरवले व आठ दहा मुले निवेदन देण्यासाठी तहसिलकडे निघाले.

याबाबत अन्य विद्यार्थ्यांना माहिती कळाली व त्यांनाही आपला मोर्चा तहसिलकडे वळवला. सुमारे दोन हजार विद्यार्थी यात सामिल झाले. अचानक निघालेल्या या मोर्चाने प्रशासनांची तारांबळ उडाली. पोलिस गाड्या बोलवण्यात आल्या. विशेष म्हणजे पोलिस अधिक्षक डॉ. निखिल पिंगळे हे स्वता तहसिलमध्ये आले. तहसिलमध्ये निवेदन दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले. तिथे त्यांना समज देण्यात आली व त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, शुल्क घेवूनही अचानक मेस बंद ठेवता येते? याची चौकशी प्रशासन करणार? अन त्यांच्यावर कार्यवाही करणार? अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

विद्यार्थ्याची उपासमार 

मेसचालकांच्या या आकस्मिक भुमिकेमुळे विद्यार्थ्याची मंगळवारी उपासमार झाली. आम्ही ऑगस्ट महिन्याचे मेसचे पैसे दिले होते. असे असताना मेस बंद ठेवणे बरोबर नाही. आम्ही विद्यार्थी सर्वसामान्य कुटंबातील आहोत. सहा- सात विद्यार्थीच निवेदन सादर करावयास जात होतो. तथापि अचानक अनेक विद्यार्थी आले. त्यामुळे गर्दी झाली. प्रशासनाला अडचणीत आणण्याचा यातील कोणाचाही उद्देश नव्हता असे निवेदन देण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. 

हेही  वाचा  

SCROLL FOR NEXT