Latest

Stock market | बाजारात चढउतार, गुंतवणूकदारांनी काय करावे?

दिनेश चोरगे

भांडवली बाजारात तेजी आणि मंदी दोन्ही गोष्टी अल्पकाळासाठी आहेत. सातत्याने गुंतवणूक आणि दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार केला असता, या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही फायदेशीर ठरते.

मार्केट स्वस्त आहे की महाग, हे कसे ओळखावे?

मार्केट स्वभाव हा तेजी-मंदीने भरलेला असतो. जो गुंतवणूकदार मंदीमध्ये गुंतवणूक करून तेजीमध्ये बाहेर पडतो, तोच नफा मिळवितो. तेजीच्या काळात प्रॉफिट बुकिंग केले पाहिजे आणि जेव्हा मंदी असेल तेव्हा आणखीन गुंतवणूक केली पाहिजे. म्युच्युअल फंड मॅनेजर हेच करीत असतात. म्हणून निफ्टीपेक्षा चांगला परतावा अनेक म्युच्युअल फंड योजनांनी दिला आहे.

सध्या निफ्टीने वीस हजारांचा निर्देशांक गाठला असला तरी मार्केट महाग आहे की स्वस्त आहे, हे पाहायचे असेल, तर (PE Ratio Market Capital To GDP Ratio) या दोन गोष्टी पाहणे गरजेचे आहे. (Stock market)

1. PE Ratio (Price to Earning Ratio) : मार्केटचा PE रेशो म्हणजे किमतीचे मिळकतीचे प्रमाण हे किती आहे हे पहिले पाहिजे. याचा अर्थ, एक रुपया मिळविण्यासाठी किती गुंतवणूक करावी हे प्रमाण हा रेषो दाखवितो. मार्केट पीई जितका कमी, तितका गुंतवणुकीसाठी बाजार चांगला म्हणजे बाजार स्वस्त आहे, असे म्हणता येईल. जितका पीई रेशो जास्त तितके मार्केट महाग असते. 2009 साली 11.48 सर्वात कमी पीई रेषो होता, 2021 साली 36.20 सर्वात अधिक होता. सध्या 23.9 इतका दाखवितो. 20 च्या आत पीई असताना गुंतवणूक केली तर येणार्‍या काळात फार चांगला परतावा मिळतो. कमी पीई असलेल्या कालवधीत गुंतवणूक केल्यास, नंतरच्या दोन-तीन वर्षांत मोठा परतावा मिळतो.

सध्या सेन्सेक्स हा 67500 च्या जवळ आहे, तर सन्सेक्सचा पीई 24.50 इतका आहे. BSE MID CAP चा पीई 27.51 आहे. BSE SMALL CAP चा पीई 26.76 इतका आहे. निफ्टी 20070 गेला असून, त्याचा पीई 22.67 इतका आहे. BANK NIFTY चा पीई 16.67 इतका आहे. लार्ज कॅप आणि बँक निफ्टी तुलनेत मिड कॅप आणि स्माल कॅप थोडे जास्त महाग वाटतात. स्माल कॅप आणि मिड कॅपमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण कमी करून इथे प्रॉफिट बुक करायला हरकत नाही.

2. MARKET CAPITAL TO GDP RATIO : देशाचा भांडवली बाजार ते देशाचे सकल उत्पन्न याच्या प्रमाणावरून मार्केट स्वस्त आहे की महाग, हे कळते. जेव्हा देशाचे सकल उत्पन्न प्रमाण मार्केट कॅपिटलपेक्षा जास्त असते तेव्हा मार्केट महाग आहे, असे समजावे आणि मार्केट कॅपिटलचे प्रमाण कमी असेल तर मार्केट स्वस्त आहे, असे समजावे. भांडवली बाजार आणि सकल उत्पन्न गुणोत्तर 50% आणि 60% च्या दरम्यान असेल, तर एकदम बाजार स्वस्त (Significantly Undervalued) आहे, गुंतवणूक करण्यास उत्तम आहे, असे समजावे. हे गुणोत्तर 60% ते 72% दरम्यान असेल तर बाजार मध्यम स्वस्त आहे (Moderately Undervalued), असे समजावे. हेच गुणोत्तर 72% ते 90% च्या दरम्यान असेल तर बाजार वाजवी मूल्य आहे (Fair Valued). हेच प्रमाण 90% ते 108% दरम्यान असेल तर बाजार मध्यम महागमूल्य (Moderately Overvalued) आहे, आणि GDP पेक्षा मार्केट कॅपिटल 108% हून अधिक असेल, तर बाजार (Mostly Overvalued) खूपच महाग मूल्य, असे समजावे. सध्याचे मार्केट कॅपिटल 99% जवळ आहे. हे महाग आहे; पण खूप महाग नाही, हे लक्षात येईल.

जसे देशाचे सकल उपन्न वाढते तसे बाजार भांडवल वाढत जाते. आपल्या देशाचा ॠऊझ येणार्‍या दहा वर्षांत 3.5 ट्रिलियन डॉलरवरून 10 ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल, असे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. तर मार्केट कॅपिटलसुद्धा तीनपट होऊ शकते. याच तुलनेत बाजारात परतावासुद्धा पाहावयास मिळणार आहे. (Stock market)

आज 'जी-20'ने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक देशांशी चांगले संबध प्रस्थापित झाले आहेत. त्याचा फार चांगला सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येणार आहे. आपली गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या सल्लागाराकडून आपल्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन करून घ्या. भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांनुसार बजेट तयार करा. मगच गुंतवणूक करा. मात्र दीर्घ काळासाठी गुंतवणूक निर्णय घेताना भांडवली बाजारात करायला विसरू नका. त्यासाठी बाजार समजावून घ्या. अभ्यास करा आणि जोखीम समजावून घ्या. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा. श्रीमंतीचा मार्ग
धरा. (समाप्त)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT