Latest

Closing Bell | शेअर बाजारात तेजीला ब्रेक! सेन्सेक्स ६५,१५१ वर बंद, ‘या’ शेअर्समध्ये विक्रीचा मारा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीची शक्यता आणि चीनमधील आर्थिक चिंतेचा गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी भारतासह अशियाई बाजारात घसरण झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) आज ४०० अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ३८८ अंकांच्या घसरणीसह ६५,१५१ वर स्थिरावला. तर निफ्टी (Nifty) ९९ अंकांच्या घसरणीसह १९,३६५ वर बंद झाला. PSU बँक वगळता ऑईल आणि गॅस, पॉवर, FMCG आणि आयटी हे सर्व क्षेत्रीय निर्देशांक ०.४ ते ०.८ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले. दरम्यान, आज भारतीय रुपया २० पैशांनी घसरून प्रति डॉलर ८३.१५ वर बंद झाला.

कमकुवत जागतिक संकेत आणि हेवीवेट स्टॉक्समधील विक्रीमुळे बाजारावर दबाव राहिला. एफएमसीजी आणि आयटी स्टॉक्समध्ये विक्रीचा जोर अधिक दिसून आला. (Stock Market Closing Bell)

निफ्टी आज १९,४५० वर खुला झाला होता. त्यानंतर तो १९,३२६ पर्यंत खाली आला. निफ्टी ५० वर अदानी पोर्ट्स, टायटन, अदानी एंटरप्रायजेस, बजाज ऑटो. एसबीआय हे शेअर्स वाढले. तर आयटीसी, LTIM, पॉवर ग्रिड, एलटी डिव्हिज लॅब, नेस्ले हे शेअर्स घसरले.

'हे' शेअर्स घसरले…

आज सेन्सेक्स ६५,५०३ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,०४६ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर आयटीसीचा शेअर सुमारे २ टक्के घसरून ४४१ रुपयांवर आला. नेस्ले, पॉवर ग्रिड, एलटी, कोटक बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टायटनचा शेअर सुमारे २ टक्के वाढून ३,०६९ वर पोहोचला. एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, एम अँड एम हे शेअर्स वधारले. (Stock Market Closing Bell)

आशियाई बाजारावर चीनमधील आर्थिक चिंतेचे सावट

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेने अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली. त्याचे पडसाद आशियाई बाजारातही उमटले. चीनमधील आर्थिक स्थितीची चिंताही आशियाई बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरली आहे.

FII, कडून खरेदी

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी ७२३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) २,४०६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT