Latest

अर्थभान : बाजाराची उसंत, सप्ताहात संथ कारभार

Arun Patil

सुधीर फडक्यांनी गायिलेले ग. दि. माडगूळकरांचे एक सुरेख गाणे आहे.
'संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदु:खाची जाणीव तिजला नाही'

काही काही वेळा शेअर बाजारातील व्यवहारांची नोंद घेताना या काव्यपक्तींचा प्रत्यय येतो. विशेषत: जे ट्रेडर्स असतात त्यांना तर असे संथ वाहणे बिलकुल अभिप्रेत नसते. त्यांना नदीचे खळाळते रूप किंवा समुद्राच्या प्रचंड लाटा आवडतात. मग त्या तेजीच्या असोत किंवा मंदीच्या बाजारात व्हॅल्यूम प्रचंड हवा तरच टे्रडिंगला काही बाब राहतो. आता याच सप्ताहाचे पहा ना, निफ्टी 50 हा निर्देशांक 0.41 टक्क्यांनी वाढून 18563.40 वर बंद झाला. सेन्सेक्स 0.31 टक्क्यांनी वाढून 62625.63 वर बंद झाला. बँक निफ्टीसुद्धा केवळ 0.45 टक्यांनी वाढून 43989 वर बंद झाला. 44000 च्या पातळीला हा निर्देशांक अजूनही धरून आहे, ही सकारात्मक बाब आहे. निफ्टी मिडकॅप 100 मात्र एक टक्क्यांनी, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 हा 1.68 टक्क्यांनी वाढला.

माझगाव डॉक आणि सुझलॅन एनर्जी हे शेअर्स पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढून या सप्ताहाचे हिरो ठरले. त्यांना टीटीएमएल, हिंदुस्थान एरानॉटिक्स, तेरेट पॉवर बाइटकॉम या शेअर्सनी चांगली साथ दिली. इंडियन एनर्जी एक्स्चेंजने 20 टक्क्यांहून अधिक गटांगळी खाल्ली. महाराष्ट्र बँकेचा शेअरही जवळ पाच-दहा टक्क्यांनी आटला. परकीय वित्तसंस्थांचा खरेदीचा ओघ सुरूच असला तरी त्यांचा ओघ थोडा मंदावला. (रु. 311.80 कोटी खरेदी) याउलट देशी गुंतवणूक संस्थांची खरेदी वाढल्याचे दिसून आले. (रु. 2521.60 कोटींची खरेदी) वर सांगितल्याप्रमाणे सुझलॉन हा शेअर या आठवड्यात 26 टक्क्यांनी वाढला.

शुक्रवार, दि. 9 जून 2023 ला त्याचा बंद भाव होता रु. 14. झिरो-टू-हिरो आणि हिरो-टू-झिरो अशा कहाण्या शेअर बाजारात बर्‍याच शेअर्सच्या बाबतीत घडत असतात. अशा पैकीच सुझलॉन हा एक शेअर सन 2008 च्या आसपास हा शेअर गुंतवणूकदारा ट्रेडर्स अशा सर्वांचाच लाडका शेअर होता. 4 जानेवारी 2008 रोजी या शेअरच्या भावाने रु. 459 चा उच्चतम भाव दाखवला होता. तर 9 नोव्हेंबर 2021 रोजी रु. 7.15 चा तळ दाखवला. शुक्रवार, दि. 9 जून 2023 चा त्याचा बंद भाव होता. रु. 14.00. दि. 9 नोव्हेंबर 2021 ते 9 जून 2023 या 17 महिन्यांच्या काळात हा शेअर जवळजवळ 100 टक्क्यांनी वाढला. म्हणजे या पेनी शेअरची टर्न अराऊंड स्टोरी सुरू झाली. असे मानावयाचे काय.

माझगाव डॉकयार्डचा शेअर बाजारात दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी नोंदणीकृत झाला. 135 ते 145 रु. हा त्याचा Price band होता. नोंदणीदिवशी तो ओपन झाला. रु. 216.25 ने आणि दिवसअखेरीस बंद झाला. रु. 173 वर शुक्रवार, दि. 9 जून 2023 चा या शेअरचा भाव आहे रु. 1036.90. म्हणजे केवळ 32 महिन्यांमध्ये या शेअरने 615 टक्के असा प्रचंड परतावा दिला आहे. असे भाग्य हे Long- term गुंतवणूकदारांनाच लाभते.

रिझर्व्ह बँकेच्या Monetory Policy Committee ने आपले यावर्षीच दुसरे द्वैमासिक पतधोरण या आठवड्यात जाहीर केले. रेपो रेट 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला. ही बाजाराला दिलासा देणारी गोष्ट. शिवाय 2024 साली GDP वाढीचा अंदाज 6.5 टक्के आणि महागाई दर अनुमान 5.1 टक्के व्यक्त केले.

येणार्‍या सप्ताहात निफ्टी 18450 ते 18750 या रेंजमध्ये राहील, असे वाटते.
उगार शेुगर वर्क्स ही 1939 पासून साखरनिर्मिती, इंडस्ट्रीयल आणि पोर्टेबल अल्कोहोलनिर्मिती आणि वीजनिर्मिती आणि वितरण सेक्टरमध्ये काम करणारी एक उत्कृष्ट कंपनी आहे. 3 वर्षांची सरासरी विक्री वाढ 27 टक्के, नफा वाढ 96 टक्के, 48 टक्के अशी अत्यंत चांगली तिची आकडेवारी आहे. शुक्रवारचा बंद भाव रु. 117 आहे. असे चांगले शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT