Latest

‘बोल बजरंग बली की जय’चा गजर अन् कुस्तीप्रेमींचा टाळ्यांचा कडकडाट

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : भाजप, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे आयोजिलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेत बक्षिसाचे खास आकर्षण असलेली अर्धा किलो सोन्याची गदेचा मानकरी सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला.
मागील दोन दिवसापासून सकाळ व संध्याकाळ कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू होता. रविवारी सकाळी विविध वजन गटातील अंतिम कुस्त्या पार पडल्या. फक्त खुल्या गटातील उपांत्य फेरी व अंतिम फेरीच्या दिग्गज मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या.

वाडिया पार्क क्रीडा संकुल प्रेक्षकांनी कुस्ती पाहण्यासाठी गच्च भरले होते. 'बोल बजरंग बली की जय'चा गजर करीत कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. उपविजयी मल्ल शिवराज राक्षेला 2 लाख व तृतीय विजेते ठरलेले गादी व माती विभागातील सिकंदर शेख, माऊली कोकाटे (पुणे) यांना प्रत्येकी 50 हजार देण्यात आले. विविध वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या म÷ल्लांना अनुक्रमे 1 लाख, पन्नास हजार व तीस हजार, तसेच 79, 86 किलो वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना 1 लाख 25 हजार, 75 हजार व 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले.

यावेळी अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार, खासदार रामदास तडस, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संयोजन समितीचे अभय आगरकर, वसंत लोढा, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, शहर प्रमुख दिलप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, भानुदास बेरड आदींसह मोठ्या संख्येने युतीचे पदाधिकारी व हजारो कुस्ती शौकीन नागरिक उपस्थित होते.

आमदार राम शिंदे म्हणाले, प्रेक्षकांची उत्कंटा पाहून मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुस्तीला बळद्यावे अशी अपेक्षा व्यक्त करत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. भाजपचे वसंत लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सचिन जाधव यांनी केले. ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल शिंदे यांनी आभार मानले. यावेळी हजारो कुस्ती शौकीन नागरिक उपस्थित होते.

मोठा योगायोग
छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभनिमित्त संयोजन समितीने शहरातून शोभायात्रा काढली होती. त्यावेळी बक्षीस म्हणून देण्यात येणारी सोन्याची गदा महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते हनुमंताच्या चरणी अर्पण करण्यात आली होती. शेवटच्या कुस्तीतीही महेंद्रलाच विजयी घोषित केल्याने सोन्याची गदाही त्यांलाच मिळाली आहे. हा मोठा योगायोगच म्हणावे लागेल.

प्रशिक्षकाच्या पाठबळाने महेंद्रचा विजय
माती प्रकारात अंतिम सामना सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झाला. पै.सिकंदर शेख पहिल्यापासून शांत खेळत होता. तसाच सल्ला महेंद्रचा प्रशिक्षकही महेंद्रला देत होता. कारण, सिकंदर हा महेंद्र आक्रमक होण्याची वाट पाहता. महेंद्र थकल्यानंतर चढई करण्याचा सिकंदरचा प्रयत्न होता. परंतु, प्रशिक्षकांचा 'बरोबर आहे, लढ' हा सल्ला महेंद्रला कामाला आला. शेवटच्या क्षणी महेंद्रने ताकदीच्या जोरावर बाजी पलटविली आणि विजयी मिळविला. त्यासाठी प्रशिक्षकाचा सल्ला मोलाचा ठरला.

कुस्तीप्रेमींची अलोट गर्दी
आज दिवसभरात तीन कुस्त्या झाल्या. माती प्रकार व गादी प्रकारात प्रत्येकी एक आणि अंतिम सामना झाला. त्यामुळे सायंकाळपासून कुस्तीप्रेमींच्या गर्दीने संपूर्ण वाडिया पार्क मैदान भरून गेले होते. शेवटच्या कुस्तीला उशीर होत असल्याने मान्यवराच्या भाषणात कुस्तीप्रेमींनी ओरड सुरू केली. यावेळी आमदार राम शिंदे, वसंत लोढा, अभय आगरकर यांना भाषणे आटोपती घ्यावी लागली.

आमचं नगर अहिल्यानगर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलण्यास मंचावर आल्यानंतर उपस्थितीत कुस्तीप्रेमींनी आमचं नगर अहिल्यानगर अशी घोषणा बाजी केली. उपमुख्यमंत्र्याचे आगमन झाल्यानंतर ऐतिहासिक गीतांचा कार्यक्रम झाला. त्या कलाकरांच्या अदाकारीने कुस्तीप्रेमींनाही मंत्रमुग्ध केले.

SCROLL FOR NEXT