Latest

डिजिटल जर्नालिझमचे अभ्यासक्रम सुरू करा : डॉ. प्रतापसिंह जाधव

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात डिजिटल जर्नालिझमचे अभ्यासक्रम सुरू करा, अशा सूचना दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी बुधवारी प्रशासनाला केल्या.

'डॉ. ग. गो. जाधव अध्यासन' कामकाजाचा डॉ. जाधव यांनी आढावा घेतला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. अध्यासनाची इमारत शिवाजी विद्यापीठ परिसरातील आकर्षण ठरणारी आहे, असे सांगत या अध्यासनातील अन्य कामांचा तातडीने प्रस्ताव सादर करा, अशी सूचना डॉ. शिर्के यांनी केली.

या वेळी डॉ. जाधव म्हणाले, "सध्याचे युग डिजिटल आहे. त्याद़ृष्टीने जर्नालिझमचे अभ्यासक्रम तयार करून ते सुरू करावेत. अध्यासनाच्या वतीने विद्यापीठात 'कम्युनिटी रेडिओ' सुरू केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर 'रेडिओ जॉकी'चाही अभ्यासक्रम सुरू करावा. अँकर निर्मिती अभ्यासक्रमही सुरू करता येईल. त्याद़ृष्टीने नियोजन करा."

अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी अध्यासनाच्या वतीने सुरू असलेले अभ्यासक्रम, भविष्यातील योजना आदींची माहिती दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, अभियंता गिरीश कुलकर्णी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. आर्किटेक्चर शीतल पाटील, अतुल शिरोडकर यांनी सादरीकरण केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता अनिता पाटील, ठेकेदार सुनील नागराळे, उपकुलसचिव रणजित यादव, धैर्यशील पाटील, सदानंद पाटील, नितीन ऐनापुरे, रमेश पोवार, एन. डी. लाड आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT