Latest

Netherlands vs Sri Lanka : श्रीलंकेने चाखली पहिल्या विजयाची चव

मोहन कारंडे

लखनौ; वृत्तसंस्था : सदिरा समरविक्रमाने ठोकलेल्या नाबाद 91 धावांच्या जोरावर श्रीलंकेने यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी आपल्या पहिल्या विजयाची न्यारी चव चाखली. त्यांनी नेदरलँडला 5 गडी राखून पराभूत केले. सदिराने आपल्या शानदार खेळीत सात चौकार लगावले.

लखनौ येथील वाजपेयी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने 262 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने पाच गडी गमावून 263 धावा केल्या. या स्पर्धेत त्यांनी पहिला विजय मिळवला. श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार समरविक्रमा ठरला. त्याने 107 चेंडूंत 91 धावा केल्या. विशेष म्हणजे नेदरलँडचे गोलंदाज त्याला शेवटपर्यंत बाद करू शकले नाहीत.

नेदरलँडकडून आर्यन दत्त सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दत्तने 10 षटकांत 44 धावा मोजून 3 गडी बाद केले. याशिवाय पॉल वॉन मीकेरेन आणि कॉलिन अकरमन यांना 1-1 विकेट मिळाली.

कसून रजिथा आणि दिलशान मधुशंका यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर समरविक्रमाच्या खेळीमुळे श्रीलंकेने पहिला विजय नोंदवला. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धक्का देणार्‍या नेदरलँडकडून यावेळीही दमदार कामगिरीची अपेक्षा होती. त्यांनी श्रीलंकेसमोर काही आव्हान उभे केले. तथापि, रखडत का असेना श्रीलंकेने 263 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

साइब्रांड-बीक भागीदारीने तारले

नेदरलँडचा डाव 49.4 षटकांत 262 धावांवर आटोपला. एकवेळ नेदरलँड संघाने 91 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. मात्र, यानंतर साइब्रांड एंगेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांच्या 135 धावांच्या भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत आणले. विश्वचषकात सातव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यामध्ये साइब्रांडने 82 चेंडूंत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या तर व्हॅन बीकने 75 चेंडूत 1 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका आणि कसून

रजिताने प्रत्येकी चार विकेटस् घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने पहिल्या तीन विकेटस् 104 धावांत गमावल्या होत्या. त्यानंतर समरविक्रमाने संघाची धुरा सांभाळली आणि चरित असलंकाने त्याला सुरेख साथ दिली. या जोडीने धावसंख्या 181 धावांपर्यंत नेली आणि असलंका 66 चेंडूंत 44 धावा करून आऊट झाला. तथापि, समरविक्रमाने 91 धावांची खेळी खेळत सामना संपवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT