Latest

Women Asia Cup: रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 1 धावेने पराभव, भारत-श्रीलंका यांच्यात होणार फायनल

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : women asia cup : महिला आशिया चषक टी 20 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला. प्रथम खेळताना श्रीलंकेने निर्धारित 20 षटकात 6 बाद 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 6 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा करता आल्या आणि सामना गमावला. इनोका रणवीरा (2/17) हिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अंतिम फेरीत श्रीलंकेचा सामना भारताशी होईल. पहिल्या उपांत्य फेरीत भारताने थायलंडचा पराभव करत विक्रमी आठव्यांदा आशिया कपची फायनल गाठली आहे.

श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र चौथ्या षटकातच कर्णधार चमारी अटापट्टूच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. ती 10 धावा करून बाद झाली. दुसरी सलामीवीर अनुष्का संजीवनीने सावध फलंदाजी करत 21 चेंडूत 26 धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर हर्षिता माधवी आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी डाव पुढे नेत 50 धावा जोडल्या. डी सिल्वाने 27 चेंडूत 14 धावा केल्या. त्याचवेळी हर्षिताने 41 चेंडूत 35 धावांची खेळी केली. हसिनी परेरानेही 13 धावांचे योगदान दिले. खालच्या क्रमवारीत ओशादी रणसिंगे 8 आणि कविशा दिलहरीने नाबाद 7 धावा केल्या. पाकिस्तानच्या नाशरा संधूने सर्वाधिक तीन बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. मुनिबा अली आणि सिदरा अमीन या जोडीने पहिल्या तीन षटकात 31 धावा दिल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुनिबाची विकेट पडली आणि ती 18 धावांवर बाद झाली. सिदराही 9 धावा करून धावसंख्या 47 असताना पॅव्हेलियनमध्ये परतली. ओमामा सोहेलने 10 धावा केल्या. कर्णधार बिस्माह मारूफ आणि निदा दार यांनी चौथ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शेवटच्या चार षटकांत संघाला विजयासाठी 23 धावा हव्या होत्या आणि 7 विकेट्स शिल्लक होत्या. येथून 18 व्या षटकात मारूफ 41 चेंडूत 42 धावा करून बाद झाली. यानंतर पाकिस्तान धावांसाठी झुंजत असल्याचे दिसत होते. अखेरच्या षटकात पाकिस्तानला 9 धावांची गरज होती आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज होती मात्र निदा दार (26) धावबाद झाली आणि संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने सर्वाधिक दोन बळी घेतले.

या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. श्रीलंकेच्या महिला संघाला पुरुष संघाप्रमाणे यंदाही विजेतेपद मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT