Latest

Sri Lanka economic crisis : राजपक्षे बंधूंनी अशी बुडवली सोन्याची लंका

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
भारताचा शेजारी असणारा लहानसा देश म्हणजे श्रीलंका. पाचूचा देश असेही या देशाचे वर्णन अनेकांनी केलेले आहे; पण हा देश सध्या आर्थिक संकटात आहे. अन्नधान्य, औषधे अशा कोणत्याही वस्तू श्रीलंकेत मिळत नाहीत, या वस्तूंच्या किंमतीही गगनाला भि़डलेल्या आहेत. लोक रस्त्यावर आक्रोश करत आहेत. पंतप्रधानांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. श्रीलंकेच्या या पतनाला जबाबदार आहेत, ते चार भाऊ. दोन वर्षांत श्रीलंकेला रसातळाला नेण्याचे पाप राजपक्षे बंधूंनी केले आहे. ( Sri Lanka economic crisis)

गोटाबाया राजपक्षे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी तातडीने त्यांचे बंधू महिंदा यांची नेमणूक पंतप्रधान म्हणून केली. तर दुसरे बंधू बासिल यांची नियुक्ती अर्थमंत्री म्हणून जुलै २०२१ ला करण्यात आली. तर ज्‍येष्‍ठ बंधू चमाल कॅबिनेट मंत्री झाले. इतकेच नाही तर चमला यांचे पुत्र कॅबिनेट दर्जा नसलेले मंत्री आहेत. कॅबिनेट आणि एकूण प्रशासनात अशा प्रकारे राजपक्षे यांच्या नातेवाईकांची पकड आहे; पण या सत्तेचा कसलाही उपयोग श्रीलंकेला वाचवण्यासाठी राजपक्षे बंधू करू शकले नाहीत.

Sri Lanka economic crisis : आशियातील सर्वाधिक महागाई श्रीलंकेत

श्रीलंकेमध्ये खतांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला की, श्रीलंकेतील शेती उत्पादन एका झटक्यात खाली आले. श्रीलंकेतील महागाईचा दर हा १५ टक्के इतका झाला असून आशिया खंडातील सर्वाधिक महागाई श्रीलंकेत आहे. तर दुसरीकडे कोरोना आणि सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध यामुळे श्रीलंकेतील पर्यटन पूर्ण कोलमडले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेण्यासही नकार

सुरुवातीला राजपक्षे बंधूंनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेण्यासही नकार दर्शवला होता. तसेच कर्जाचे पुनर्घटन करण्यातही त्यांनी फारसा रस दाखवला नव्हता. आताची स्थिती अशी आहे की श्रीलंकेकडे सध्या परकीय चलन २ अब्ज डॉलर इतके आहे. तर यावर्षी श्रीलंकेला ७ अब्ज डॉलर इतक्या कर्जाची परतफेड करायची आहे. यामध्ये १ अब्ज डॉलरच्या रोख्यांचाही समावेश आहे.
२००७मध्ये महिंदा श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर होते. त्यांनी भांडवली बाजारातून कर्ज उचलले. आता श्रीलंकेच्या एकूण कर्जात भांडवली बाजारातून घेतेलेल्या कर्जाचे प्रमाण ३८ टक्के तर चीनने दिलेल्या कर्जाचे प्रमाण १० टक्के इतके आहे.आताही श्रीलंका चीनकडून नव्याने कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. एकूणच काय तर सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या राजपक्षे बंधूंनी श्रीलंकेला चांगलेच गोत्यात आणले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT