Latest

Sri Lanka economic crisis : श्रीलंकेतील परिस्थिती बिघडली; हिंसक आंदोलनानंतर कर्फ्यू लागू

दीपक दि. भांदिगरे

कोलंबो; पुढारी ऑनलाईन

श्रीलंकेची (Sri Lanka economic crisis) अर्थव्यवस्था प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक संकट हाताळण्यात सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. यात १० जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुख्य शहर कोलंबोच्या अनेक भागांमध्ये कर्फ्यू लागू केला आहे.

गुरुवारी उशिरा कोलंबो शहरातील राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या खाजगी निवासस्थानाजवळ शेकडो निदर्शक जमले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमल एडिरिमाने यांनी सांगितले आहे की, देशाची राजधानी कोलंबोच्या चार पोलीस विभागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

राष्ट्रपती गोटबाया यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटरसायकलवरुन हेल्मेट घालून आलेल्या आंदोलकांनी पोलिसांचा अडथळा पार करुन पोलिसांवर विटा फेकल्या. रस्त्याच्या बाजूला असलेली बसही आंदोलकांनी पेटवून दिली होती, असे वृत्त Reuters ने दिले आहे.

श्रीलंकेच्या आर्थिक विकासाचे (Sri Lanka economic crisis) पूर्ण गणितच कोलमडले आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेने गेल्या काही वर्षांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे. ही कर्जाची रक्‍कम भरमसाट वाढत गेली. श्रीलंकेवरील कर्ज १६ ते १७ अब्ज डॉलर्स इतके असून, यापैकी १० ते १२ अब्ज डॉलर्स हे एकट्या चीनकडून घेतलेले आहे.

येथे महागाईचा दर १७ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. १ कप चहाचा दरही १०० रुपयांवर पोहोचलाय. ब्रेडच्या एका पॅकेटसाठी १५० श्रीलंकन ​​रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेतील महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया कमकुवत होणे हे देखील आहे. मार्च महिन्यातच श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी घसरले आहे. मार्चमध्येच, १ डॉलरचे मूल्य २०१ श्रीलंकन ​​रुपयांवरून २९५ श्रीलंकन ​​रुपयांपर्यंत वाढले. त्यामुळे श्रीलंकेत महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीलंकेकडील परकीय चलन साठा जवळजवळ संपुष्टात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT